स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्काराने साखळी पालिकेचा दिल्लीत गौरव

साखळीतील सफाई कामगारांचे योगदान : पणजी शहराला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
7 hours ago
स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्काराने साखळी पालिकेचा दिल्लीत गौरव

केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते नवी दिल्लीत साखळी पालिकेला दिलेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार स्वीकारताना मंत्री विश्वजित राणे व साखळीच्या नगराध्यक्ष सिद्धी परब.

साखळी : केंद्रीय गृहनिर्माण नगर मंत्रालयातर्फे स्वच्छता सर्वेक्षणात राज्य पातळीवर साखळी नगरपालिकेने पटकावलेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दिल्ली येथील विज्ञान भवन येथे प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहनिर्माण व नगर मंत्रालयाचे मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते नगरविकासमंत्री विश्वजीत राणे, साखळीच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी साखळीचे मुख्याधिकारी श्रीपाद माजिक, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक यशवंत माडकर, रियाझ खान, दीपा जल्मी, अंजना कामत, कनिष्ठ अभियंता सुभाष म्हाळशेकर, जयेश कळंगुटकर, पर्यवेक्षक नारायण परब, सफाई मित्र अशोक हंचमणी यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी नगरपालिका योग्य दिशेने काम करीत आहे. या स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्कारात साखळीतील सफाई कामगारांचे योगदान व लोकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत साखळी नगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये साखळी नगरपालिका क्षेत्रातील लोकांनी सदैव नगरपालिकेला सहकार्य केले आहे. त्यामुळे साखळी नगरपालिका क्षेत्र स्वच्छ व सुंदर ठेवण्यात यश मिळाले, असे नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी म्हटले.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पणजी शहराला दिलेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार स्वीकारताना मंत्री विश्वजीत राणे व महापौर रोहित मोन्सेरात.

पणजी शहराला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पणजी शहराला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नगरविकास मंत्री विश्वजित राणे व पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी स्वीकारला. यावेळी मुख्याधिकारी क्लेन मेदेरा उपस्थित होत्या.

हेही वाचा