दाबोळी विमानतळावरील टाऊट्सकडून टॅक्सीचालकाला धमकी

पोलिसांसमोर आव्हान : टाऊट्सला अटक करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th July, 11:35 pm
दाबोळी विमानतळावरील टाऊट्सकडून टॅक्सीचालकाला धमकी

वास्को : दाबोळी विमानतळावरील टाऊट्सनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. या टाऊट्सपैकी एकाने बुधवारी सकाळी दाबोळी विमानतळावरील पिवळी-काळी टॅक्सीच्या युनायटेड टॅक्सीमेन असोसिएशनाच्या एका सदस्याला बाहेर भेटल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या असोसिएशनाच्या पदाधिकारी व सदस्यांनी दाबोळी विमानतळ पोलीस स्थानकावर त्या टाऊट्सला अटक करण्याची मागणी करीत तेथेच ठाण मांडले.

दाबोळी विमानतळावर रेंट-अ-कारचालक आपली वाहने उभी करतात. सदर प्रकार अवैध आहे. तरीसुद्धा ते बिनदिक्कतपणे आपली वाहने तेथे उभी करतात. विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना टॅक्सी मिळवून देण्यासाठी टाऊट्स अवैधरित्या तेथे व्यवसाय करतात. त्यामुळे वैधरित्या व्यवसाय करणाऱ्या टॅक्सीचालकांना ग्राहक मिळत नसल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार संघटनेतर्फे करण्यात येते. याप्रकरणी सतत तक्रारी करूनही कडक कारवाई होत नाही. तक्रार केल्यावर पोलीस थातूरमातूर कारवाई करतात. याप्रकरणी गेल्या आठवड्यात संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी तक्रार केल्यावर पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी पाहणी केली होती. त्यांनी तेथील टाऊट्सचा बंदोबस्त करण्याचे तसेच तेथे रेंट-अ-कार उभ्या करण्यास मज्जाव केला जाईल, असे आश्वासन दिले होते. तथापी अद्याप परिस्थिती तशीच असल्याचे बुधवारी सकाळी घडलेल्या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे, असे संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

त्या टाऊट्सने आम्हीही पोटासाठी करतो, असे सांगून त्या पदाधिकाऱ्याला धमकी दिली. त्यामुळे तेथे काही काळ तणाव पसरला. शिवीगाळ, अंगावर धावून जाणे वगैरे घटना व्हिडियोमध्ये चित्रित झाली. सदर व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केल्यावर त्याचे पडसाद उमटले. संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्या टाऊट्सला अटक करण्याची मागणी केल्यावर त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले. 

हेही वाचा