मडगावच्या आराध्याची जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी

सात पदकांची कमाई : ३६ वी ज्युनियर, सब ज्युनियर गोवा राज्य जलतरण स्पर्धा

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15 hours ago
मडगावच्या आराध्याची जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी

मडगाव : कोंब, मडगाव येथील आराध्या प्रदीप बोरकर (वय ८ वर्षे) या उदयोन्मुख जलपरीने नुकत्याच पार पडलेल्या ३६ व्या ज्युनियर आणि सब ज्युनियर गोवा राज्य जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत ७ पदके पटकावली आहेत. गोवा जलतरण संघटनेने ११, १२ आणि १३ जुलै रोजी फोंडा जलतरण संकुलात या स्पर्धेचे आयोजन केले होते.
मागील स्पर्धांमधील यश
यापूर्वीही आराध्याने अनेक स्पर्धांमध्ये आपली छाप सोडली आहे. १९ मे २०२४ मध्ये रोटरी क्लब ऑफ फोंडा आयोजित ग्रुप ५ गटात ५० मीटर बटरफ्लाय आणि बॅकस्ट्रोक मध्ये २ रौप्य पदके.
जुलै २०२४ : ३५ व्या गोवा राज्य सब ज्युनियर आणि ज्युनियर जलतरण स्पर्धेत (फोंडा येथे) ४ पदके (२ सुवर्ण आणि २ कांस्य). यामध्ये ४x५० मीटर मेडले रिले आणि ४x५० मीटर फ्रीस्टाईल रिलेमध्ये पहिले स्थान, तर ५० मीटर बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लायस्ट्रोक मध्ये तिसरे स्थान.
१ मे २०२५ : एमआयगोस दे क्लार्कने आयोजित केलेल्या मांडवी नदी पार करण्याच्या स्पर्धेत सहभाग. (रिबंदर फेरी ते दिवर फेरी)
४ मे २०२५ : रोटरी क्लब ऑफ फोंडा न्यू जनरेशनने आयोजित केलेल्या ८ व्या अखिल गोवा जलतरण स्पर्धेत (ग्रुप ५) ५० मीटर फ्रीस्टाईल आणि ब्रेस्टस्ट्रोकमध्ये दुसरे स्थान, तर ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये तिसरे स्थान.
२८ आणि २९ जून २०२५ : सादा जलतरण तलाव, म्हापसा, वास्को येथे झालेल्या तिसऱ्या वार्षिक एफएफएल स्विम मीटमध्ये ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि बॅकस्ट्रोकमध्ये दुसरे स्थान, तर ५० मीटर बटरफ्लायस्ट्रोकमध्ये तिसरे स्थान.
आराध्याचे कौटुंबिक, शैक्षणिक जीवन
आराध्या ही प्रदीप आणि नीलिमा बोरकर यांची कन्या असून, ती कोंब, मडगाव येथील विद्या भारती प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. अभ्यासातही ती एक हुशार विद्यार्थिनी आहे. तिने आपल्या यशाबद्दल पालकांचे, तिला पोहायला शिकवणारे प्रशिक्षक प्रकाश नाईक, सध्याचे प्रशिक्षक इनासियो रापोसो आणि शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे आभार मानले आहेत. आराध्याचे हे यश तिच्या अथक मेहनतीचे आणि योग्य मार्गदर्शनाचे प्रतीक आहे.
पदकांची लयलूट
आराध्याने ५० मीटर बॅकस्ट्रोक आणि ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात पहिले स्थान पटकावले. तसेच, ४x५० मीटर मेडले रिले आणि ४x५० मीटर फ्रीस्टाईल रिलेमध्येही तिने सुवर्णपदक मिळवले. ५० मीटर बटरफ्लायस्ट्रोक आणि फ्रीस्टाईलमध्ये तिला दुसरे स्थान मिळाले, तर १०० मीटर वैयक्तिक मेडले रिलेमध्येही तिने दुसरे स्थान पटकावले.