लक्ष्य सेन, सात्विक-चिराग दुसऱ्या फेरीत
टोकियो : भारताची दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा पहिल्याच फेरीत पराभूत झाली आहे. दुसरीकडे, लक्ष्य सेन आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीच्या जोडीने मात्र सहज विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
पुरुष दुहेरीमध्ये, सध्या विश्व क्रमवारीत १५ व्या स्थानावर असलेल्या सात्विक आणि चिराग या जोडीने कोरियाच्या कांग मिन ह्युक आणि किम डोंग जू या जोडीला केवळ ४२ मिनिटांत २१-१८, २१-१० असे हरवले. भारतीय जोडीला सुरुवातीला थोडी लय पकडायला वेळ लागला, पण दुसऱ्या गेममध्ये त्यांनी वर्चस्व गाजवत सहज विजय मिळवला.
गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या लक्ष्य सेनने चीनच्या वांग झेंग जिंगला २१-११, २१-१८ असे नमवले. विश्व क्रमवारीत १८ व्या स्थानावर असलेल्या लक्ष्यने पहिल्या गेममध्ये पूर्ण नियंत्रण ठेवले आणि ११-२ अशी मोठी आघाडी घेत गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये जिंगने आव्हान दिले, पण लक्ष्यने आपली लय कायम ठेवत विजय मिळवला.
सिंधूची निराशाजनक कामगिरी
पूर्व विश्वविजेत्या ३० वर्षीय सिंधूला या सुपर ७५० स्पर्धेत कोरियाच्या सिम यू जिन कडून १५-२१, १४-२१ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. या वर्षात सिंधूला पाचव्यांदा पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. पहिल्या गेममध्ये सिंधूने थोडा संघर्ष केला, परंतु तिच्या चुकांचा फायदा घेऊन सिमने तो गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू १-६ अशी पिछाडीवर पडली, मात्र तिने ११-११ अशी बरोबरी साधली. तरीही कोरियन खेळाडूने सहज आघाडी घेत सामना जिंकला आणि सिंधूविरुद्धचा पहिला विजय नोंदवला.