इंग्लंड १९२ धावांवर गारद; टीम इंडियाने गमावले ४ बळी, विजयासाठी १३५ धावांची गरज
लॉर्ड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा चौथा दिवशी रविवारी खेळ संपेपर्यंत भारताने ४ विकेट गमावून ५८ धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी १३५ धावांची आवश्यकता आहे. इंग्लंड आणि भारताचा पहिला डाव ३८७ धावांवर संपला. दुसऱ्या डावात इंग्लंडने १० विकेट गमावून १९२ धावा केल्या आणि भारताला १९३ धावांचे लक्ष्य दिले. दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, केएल राहुल ४७ चेंडूत सहा चौकारांसह ३३ धावा करून नाबाद परतला आहे.
तत्पूर्वी, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर वर्चस्व गाजवत इंग्लंडचा दुसरा डाव केवळ १९२ धावांवर गुंडाळला आहे. भारताला आता ही कसोटी जिंकण्यासाठी फक्त १९३ धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
इंग्लंडचा डाव गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वॉशिंग्टन सुंदरने आपल्या फिरकी गोलंदाजीने आग ओकत सर्वाधिक ४ बळी घेतले. त्याच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचे फलंदाज तंबूत परतण्यास मजबूर झाले. याशिवाय, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ बळी टिपले. नीतीश रेड्डी आणि आकाशदीप यांनीही प्रत्येकी एक महत्त्वपूर्ण विकेट घेत इंग्लंडचा कणा मोडला.
इंग्लंडच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी
इंग्लंडच्या फलंदाजांच्या खराब स्थितीचे एक मुख्य कारण म्हणजे लॉर्ड्सच्या खेळपट्टीचा मंदावलेला वेग आणि भारताच्या गोलंदाजांचा अचूक मारा. या सामन्याच्या पहिल्या डावात भारत आणि इंग्लंड दोघांनीही ३८७ धावा केल्या होत्या, त्यामुळे कोणालाही मोठी आघाडी मिळाली नव्हती. आता इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १९२ धावांवर आटोपला आहे. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा अनुभवी जो रूटने केल्या, ज्याने ४० धावांची खेळी केली.
भारताला पहिले यश मोहम्मद सिराजने मिळवून दिले, ज्याने बेन डकेटला फक्त १२ धावांवर बाद केले. या विकेटचा आनंद साजरा करताना, सिराजच्या खांद्याला डकेटचा खांदा लागला, ज्यामुळे मैदानावर थोडा गोंधळ निर्माण झाला. इंग्लंडने ५० धावांपर्यंतच ३ विकेट गमावल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या. हॅरी ब्रूकची बॅट पुन्हा एकदा शांत राहिली, तो २३ धावा करून बाद झाला.
रूट-स्टोक्सची महत्त्वपूर्ण भागीदारी
यानंतर, जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी पुन्हा एकदा भारतीय संघाला बराच काळ विकेटसाठी दूर ठेवले. दोघांनी मिळून ६७ धावांची अत्यंत महत्त्वाची भागीदारी केली, ज्यामुळे इंग्लंडला काही प्रमाणात सावरता आले. मात्र, ही भागीदारी फार काळ टिकली नाही. रूट ४० धावांवर बाद झाला, तर स्टोक्सने ३३ धावा काढून माघार घेतली. त्यांच्या विकेटनंतर इंग्लंडचा डाव लवकरच संपुष्टात आला.
वॉशिंग्टन सुंदरचे ४ बळी
लॉर्ड्स कसोटीत भारताला केवळ १९३ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. इंग्लंडला २०० धावांपेक्षा कमी धावसंख्येवर रोखण्यात वॉशिंग्टन सुंदरचा सर्वात मोठा वाटा होता, त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीत इंग्लंडच्या ४ फलंदाजांना अडकवून त्यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनीही भेदक मारा करून प्रत्येकी दोन बळी घेऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले.
टीम इंडिया लॉर्ड्सवर इतिहास घडवणार?
लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने यापूर्वी कधीही १५० धावांपेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही. येथे टीम इंडियाचा सर्वात मोठा धावसंख्येचा यशस्वी पाठलाग १३६ धावांचा आहे, जो १९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. यामुळे, आता १९३ धावांचे लक्ष्य गाठणे हे भारतीय संघासाठी एक नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची ऐतिहासिक संधी आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा संघ ही संधी साधून लॉर्ड्सवर इतिहास घडवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
टीम इंडियाला सलग दुसऱ्या विजयाची संधी
इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील ५ सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत आहे. इंग्लंडने लिड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियावर ५ विकेट्सने मात करत विजय सलामी दिली. त्यानंतर बर्मिंगहॅममध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पलटवार केला आणि ३३६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे आता टीम इंडियाला लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडवर मात करत सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी आहे.
इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत
भारतासाठी सर्वाधिक धावा
६०३ - शुभमन गिल (२०२५)*
६०२ - राहुल द्रविड (२००२)
५९३ - विराट कोहली (२०१८)
५४२ - सुनील गावस्कर (१९७९)
४६१ - राहुल द्रविड (२०११)
वॉशिंग्टनच्या १०० विकेट्स पूर्ण
‘क्रिकेटची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदरला एकही विकेट घेता आली नव्हती. पण, २५ वर्षीय या फिरकी अष्टपैलू खेळाडूच्या मेहनतीला सामन्याच्या चौथ्या दिवशी यश आले. रविवारी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सुंदरने चार विकेट्स घेतल्या. त्याने दिग्गज फलंदाज जो रूट (४०), कर्णधार बेन स्टोक्स (३३), यष्टिरक्षक जेमी स्मिथ (८) आणि शोएब बशीर (२) यांना बाद केले. यासह सुंदरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खास शतक पूर्ण केले. त्याने १०० आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा गाठला.