गोव्याच्या अरुणिमा बोसचे जागतिक स्तरावर मोठे यश

रिले प्रकारात इंग्लिश चॅनेल १५ तास ५८ मिनिटांत यशस्वीरित्या केला पार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
12th July, 08:56 pm
गोव्याच्या अरुणिमा बोसचे जागतिक स्तरावर मोठे यश

पणजी : गोवा येथील जलतरणपटू अरुणिमा बोस हिने जागतिक स्तरावरील मोठे यश मिळवत इंग्लिश चॅनेल यशस्वीरीत्या पार केले आहे. २१ जून रोजी, तिने ३४ किलोमीटरचे खडतर अंतर रिले संघाचा सदस्य म्हणून पार करत भारताचे नाव जागतिक पोहण्याच्या नकाशावर अधोरेखित केले आहे.
अरुणिमा ही भारतातील ‘स्विमलाइफ अ‍ॅरोज’ या पाच सदस्यीय संघाची सदस्य होती. संघात अविनाश ठडानी, किरण राजगोपाल, मधुर गोपाल आणि यज्ञ सोमयाजी यांचा समावेश होता. या संघाने इंग्लंडच्या डोव्हर येथील शेक्सपिअर बिचपासून फ्रान्सच्या कॅप ग्रिस नेझ पर्यंतचा समुद्रमार्ग १५ तास ५८ मिनिटांत पूर्ण केला.
इंग्लिश चॅनेल हे ‘सेव्हन ओशन चॅलेंज’ या प्रतिष्ठेच्या मालिकेतील एक महत्त्वाचे पर्व आहे. यंदाचे वर्ष विशेष होते. पहिल्यांदाच इंग्लिश चॅनेल पार करणाऱ्या कॅप्टन मॅथ्यू वेब यांच्या कामगिरीला १२५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त या ‘चॅलेंज’चे आयोजन करण्यात आले होते.
अरुणिमा ही पणजीस्थित एक्सप्रेसिव्ह आर्ट थेरपिस्ट असून, ती गोवा ओपन वॉटर स्विमिंग क्लब (जीओडब्ल्यूएससी) ची मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. खुल्या समुद्रात पोहण्याचा अनुभव देणाऱ्या जीओडब्ल्यूएससीतर्फे ती भारतभरातील जलतरणपटूंना मार्गदर्शन देते.
अरुणिमा म्हणाली, मी लहानपणापासूनच पोहत आले आहे. पण गोव्यातील समुद्रांमुळे खुल्या पाण्यात पोहण्याची प्रेरणा मिळाली. तेथूनच हे आव्हान स्वीकारायची इच्छा झाली.
त्यानुसार, प्रशिक्षणाचे शारीरिक पैलू पोहणे, व्यायाम यांमध्ये ती सुसंगत होती. मात्र, थंड पाण्यात पोहण्याची तयारी म्हणजे ‘आइस बाथ’ बर्फाच्या पाण्यात पोहणे हे खूप कठीण काम होते असे ती म्हणाली. मी ध्यानधारणा, श्वसनतंत्र आणि दृश्यकल्पना यांच्याद्वारे मानसिक ताकद निर्माण केली, असे तिने सांगितले.
गोमंतकीय मुलींसाठी प्रेरणास्थान
अरुणिमाची ही कामगिरी गोव्याच्या युवकांना आणि विशेषतः मुलींना खुले आकाश गाठण्यासाठी नवे क्षितिज खुले करणारी आहे. समुद्राच्या लाटा, थंडी आणि दूरवरचा पल्ला यांवर मात करत अरुणिमाने केलेली कामगिरी ही चिकाटी, तयारी आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.