ज्याे रूट शतकाच्या उंबरठ्यावर
लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे पार पडला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ४ बाद २५१ धावा करत दिवसाचा खेळ संपवला. अनुभवी फलंदाज ज्याे रूट ९९ धावांवर नाबाद असून कर्णधार बेन स्टोक्स ३९ धावांवर खेळत आहे.
नाणेफेक इंग्लंडने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच इंग्लिश फलंदाजांवर दबाव टाकला. विशेषतः नीतीश कुमार रेड्डी याने एका षटकात दोन्ही सलामीवीरांना बाद करत इंग्लंडला मोठे धक्के दिले. बेन डकेट २३ (४० चेंडू) तर झॅक क्रॉली १८ (४३ चेंडू) धावा करून बाद झाला. रविंद्र जडेजा याने ओली पोप (४४) याला बाद करत महत्त्वपूर्ण भागीदारी तोडली. जसप्रीत बुमराह याने हॅरी ब्रूक (११) ला झेलबाद करून भारताला चौथे यश मिळवून दिलं.
इंग्लंडचा माजी कर्णधार ज्याे रूट याने जबाबदारीने फलंदाजी करताना नाबाद ९९ धावा केल्या. त्याने ओली पोपसोबत १०९ धावांची भागीदारी करत डाव सावरला. दिवसअखेर रूट आणि स्टोक्स या दोघांनी इंग्लंडचा डाव सन्मानजनक स्थितीत नेला.
दुसऱ्या दिवशी भारताला इंग्लंडला ३००च्या आत रोखण्याचे लक्ष्य असेल. दुसरीकडे, इंग्लंडला चांगली सुरुवात मिळाल्यानंतर त्याचा लाभ घेत मोठी धावसंख्या उभारायची आहे.
ज्याे रुटचा विक्रम
तिसऱ्या कसोटी सामन्यात ४५ धावा करताच ज्याे रूटने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताविरुद्ध ३००० धावा पूर्ण केल्या. भारताविरुद्ध कसोटीत असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध इतक्या धावा कोणत्याही फलंदाजाला करता आल्या नव्हत्या. रूटनंतर दुसऱ्या क्रमांकावर रिकी पॉन्टिंग आहे, ज्याने भारतीय संघाविरुद्ध २५५५ कसोटी धावा केल्या आहेत.
भारताविरुद्धच केले होते कसोटी पदार्पण
ज्याे रूटने २०१२ मध्ये भारताविरुद्धच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने भारताविरुद्ध ३३ कसोटी सामन्यांत एकूण ३००९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या बॅटमधून १० शतके आणि १३ अर्धशतके आली आहेत. भारताविरुद्ध मागील दोन कसोटी सामन्यांत रूटला चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण आता तो पुन्हा लयीत परतला आहे. रूटकडे अप्रतिम तंत्र आहे आणि एकदा तो खेळपट्टीवर स्थिरावला की, त्याला बाद करणे कठीण होते.
कसोटी क्रिकेटमध्ये १३००० हून अधिक धावा
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तो इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत कसोटीत १३१६९ धावा केल्या असून यात ३६ शतके आणि ६७ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, त्याने इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७१२६ धावा आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८९३ धावा केल्या आहेत.
भारताने यष्टिरक्षक बदलला
लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाला अचानक आपला यष्टिरक्षक बदलावा लागला. यष्टिरक्षण करताना एक चेंडू ऋषभ पंतच्या बोटाला जोरात लागला, त्यानंतर तो वेदनेत दिसला. पंतची अवस्था पाहून फिजिओला तातडीने मैदानावर यावे लागले. फिजिओने पंतच्या बोटावर स्प्रे मारला. मात्र, यानंतरही पंतच्या वेदना कमी झाल्या नाहीत आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. पंतच्या जागी ध्रुव जुरेल याने यष्टिरक्षक म्हणून मैदानावर प्रवेश केला. पंतच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. या दौऱ्यावर आतापर्यंत पंतने फलंदाजीने अप्रतिम कामगिरी केली आहे. हेडिंग्ले कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये पंतने शतके ठोकली होती, तर एजबॅस्टन येथेही त्याची बॅट चांगलीच तळपली होती.