‘गोल्डन बॉय’ नीरज चाेप्राने सांगितल्या ऐतिहासिक ९० मी. थ्रो मागील आठवणी

भारत आर्मीच्या पाठिंब्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
04th July, 08:25 pm
‘गोल्डन बॉय’ नीरज चाेप्राने सांगितल्या ऐतिहासिक ९० मी. थ्रो मागील आठवणी

नवी दिल्ली : अनेकांसाठी ९० मीटर हे केवळ अंतर असेल, मात्र माझ्यासाठी ताे वर्षानुवर्षे केलेल्या संघर्षाचा आणि माझ्या दृढ निश्चयाचा प्रवास आहे. कारण अनेक वर्ष दुखापतीमुळे मी थ्रो करू शकत नव्हतो. त्यामुळे मी याेग्य तंत्र आत्मसात करू शकत नव्हतो. अनेक वर्षे सराव करू शकलो नव्हतो, असे भारताचा ‘गोल्डन बॉय’ याने एका मुलाखतीत सां​गितले.
नीरज चोप्राने आपल्या ९० मीटरच्या ऐतिहासिक थ्रोबाबतच्या आठवणी, संघर्ष, आणि नव्या स्पर्धेबाबतची उत्सुकता भारत आर्मीसोबत शेअर केली. ताे म्हणाला, सगळेजण एकच विचारत होते. कधी पार करणार ९० मीटर? पण कुणाला माहित नव्हते की, मी काय सहन करत होतो. दुखापतींमुळे मी काही वर्षे थ्रो आणि तंत्राचा सराव नीट करू शकलो नाही. ज्या दिवशी मी शेवटी ९० मीटर पार केले, तो क्षण फक्त एक थ्रो नव्हता, ती होती वर्षानुवर्षांची प्रतीक्षा, एक भावनांचा स्फोट. समाधान, सगळे काही त्या क्षणात होते, असे नीरजने स्पष्ट केले.
आता तो ‘नीरज चोप्रा क्लासिक’ स्पर्धेसाठी सज्ज होत आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या पाठीशी भारत आर्मी असणार आहे. भारत आर्मी केवळ क्रिकेटसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडापटूला बळ देते. त्यांचे मैदानातले जोशपूर्ण वातावरण, ढोल, झेंडे, घोषणा, हे सगळे एखाद्या खेळाडूसाठी अमूल्य असते, असे नीरज म्हणाला.

‘नीरज चोप्रा क्लासिक २०२५’ ही स्पर्धा आजपासून

‘नीरज चोप्रा क्लासिक २०२५’ ही स्पर्धा शनिवार, ५ जुलै रोजी बेंगळुरूच्या कांतीरव स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नीरज पुन्हा एकदा ९० मीटरची झेप घेण्याचा प्रयत्न करणार आहे. यावर्षी मे महिन्यात दोहामध्ये त्याने पहिल्यांदाच ९०.३२ मीटरचा विक्रमी थ्रो केला होता. नीरज चोप्राने वयाच्या फक्त २७व्या वर्षीच ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपचे सुवर्ण, डायमंड लीग फायनल्स ट्रॉफी, तसेच एशियन गेम्स आणि राष्ट्रकुल स्पर्धांचे सुवर्णपदक जिंकत आपली कारकीर्द दंतकथेप्रमाणे घडवली आहे.
चाहत्यांचा आवाज हीच ऊर्जा
जेव्हा स्टेडियममध्ये चाहत्यांचे आवाज घुमतात, तेव्हा संपूर्ण वातावरण बदलून जाते. त्यातून मिळणारी प्रेरणा आणि आनंद हा अवर्णनीय असतो. ‘नीरज चोप्रा क्लासिक’मध्ये ते माझ्यासाठी, भारतासाठी आणि प्रत्येक खेळासाठी पुन्हा मैदानात असतील, हीच माझी अपेक्षा आहे, असे नीरज म्हणाला.