स्मिथ-ब्रूकच्या वादळानंतर सिराजचा झंझावात

दुसऱ्या कसोटीवर भारताची मजबूत पकड : भारताला २४४ धावांची आघाडी​

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
04th July, 11:57 pm
स्मिथ-ब्रूकच्या वादळानंतर सिराजचा झंझावात

बर्मिंगहॅम : शुभमन गिलच्या द्विशतकामुळे प्रथम भारताने ५८७ धावांचा डाव उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने सुरुवातीला ८४ धावांवर पाच गडी गमावले आणि भारताचा विजय निश्चित वाटू लागला. मात्र हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ या दोघांनी भारताच्या अपेक्षांना धक्का देत तुफानी ३०३ धावांची भागीदारी रचली. मात्र भारताने मोहम्मद सिराज आणि आकाश दीपच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडचा डाव ४०७ धावांवर गुंडाळत १८० धावांची निर्णायक आघाडी घेतली. दिवसअखेर भारताने १ बाद ६४ धावा केल्या होत्या. सध्या भारताकडे २४४ धावांची मजबूत आघाडी आहे. केएल राहुल २८ तर करुण नायर ७ धावांवर खेळत आहेत. यशस्वी जैस्वाल २८ धावा करून जोश टंगचा शिकार ठरला.
तिसऱ्या दिवसाचा खेळ इंग्लंडने ७७/३ या धावसंख्येपासून सुरू केला, पण सुरुवातीला त्यांना दोन मोठे धक्के बसले. मोहम्मद सिराजने दिवसाच्या दुसऱ्याच षटकात इंग्लंडला सलग दोन धक्के दिले. त्याने प्रथम जो रूट (२२) याला ऋषभ पंतच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. स्टोक्सला खातेही उघडता आले नाही.
यानंतर ८४ धावांवर पाच गडी गमावून संकटात सापडलेल्या इंग्लंडसाठी हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी संकटमोचकाची भूमिका निभावली. या दोघांमध्ये सहाव्या गड्यासाठी ३६८ चेंडूंमध्ये ३०३ धावांची शानदार भागीदारी झाली. या दरम्यान, जेमी स्मिथने ८० चेंडूंमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले, तर हॅरी ब्रूकने १३७ चेंडूंमध्ये आपले नववे कसोटी शतक साजरे केले.
ब्रूक-स्मिथने साकारली ३०३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी
दुसऱ्या सत्राचा खेळ इंग्लंडच्या ३५५/५ धावांवर संपला होता. मात्र, तिसऱ्या सत्रात आकाश दीपने हॅरी ब्रूकला बाद करत जेमी स्मिथसोबतची ३०३ धावांची भागीदारी तोडली. हॅरी ब्रूकने २३४ चेंडूंमध्ये १७ चौकार आणि एका षटकारासह १५८ धावा केल्या. दुसरीकडे, जेमी स्मिथ २०७ चेंडूंमध्ये २१ चौकार आणि चार षटकारांसह १८१ धावा करून नाबाद राहिला.
सिराजचे ६, तर आकाशचे ४ बळी
आकाश दीपने तिसऱ्या सत्रात स्मिथ व्यतिरिक्त क्रिस वोक्सलाही बाद केले. वोक्सला करुण नायरच्या हातून झेलबाद करताना त्याने फक्त पाच धावा केल्या. यानंतर मोहम्मद सिराजने ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हे तिन्ही फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. इंग्लंडच्या पहिल्या डावात भारतासाठी मोहम्मद सिराजने सहा विकेट्स घेतल्या, तर आकाश दीपने चार विकेट्स घेतल्या.
स्मिथचा विक्रम
जेमी स्मिथने अवघ्या ८० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आणि इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हॅरी ब्रूकसह तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले. हॅरी ब्रूकने २०२२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ८० चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. यासह स्मिथने आपला कर्णधार बेन स्टोक्सलाही मागे टाकले, ज्याने २०१५ मध्ये ८५ चेंडूंमध्ये कसोटी शतक झळकावले होते. भारताविरुद्ध कसोटी शतकांच्या बाबतीत स्मिथ आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वात जलद शतक डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे, ज्याने २०१२ मध्ये अवघ्या ६९ चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आहे, ज्याने २०१० मध्ये ७५ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे, ज्याने २००६ मध्ये ७८ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. आता जेमी स्मिथने ८० चेंडूंमध्ये शतक ठोकत या यादीत चौथे स्थान पटकावले आहे.

१८० धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारताने दुसऱ्या डावात आक्रमक सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल व केएल राहुल यांनी ७.४ षटकांत ५१ धावा फलकावर चढवल्या. जॉश टंगच्या गोलंदाजीवर यशस्वी पायचीत झाला. यशस्वीने २२ चेंडूंत २८ धावा केल्या आणि एक विक्रम नावावर केला. भारताकडून कसोटीत सर्वात कमी डावांत २००० धावांचा विक्रम त्याने नावावर केला. त्याने ४० डावांत हा टप्पा ओलांडून राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग यांच्याशी बरोबरी केली.
भारताने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद ६४ धावा करताना २४४ धावांची आघाडी घेतली आहे. लोकेश राहुल ३८ चेंडूंत २८ धावांवर नाबाद आहे आणि करुण नायरही मैदानावर आहे.
‘सेना’ कसोटी मालिकेत २००+ धावा करणारे भारतीय
५ - सुनील गावस्कर
५ - केएल राहुल*
३ - वीरेंद्र सेहवाग
२ - विजय मर्चंट
२ - विनू मांकड
२ - फारोख अभियंता
२ - चेतन चौहान
२ - रवी शास्त्री
२ - गौतम गंभीर
२ - मुरली विजय
२ - यशस्वी जैस्वाल*
सर्वांत कमी डावात २००० धावा पूर्ण करणारे भारतीय
३९ - वीरेंद्र सेहवाग
४० - रोहित शर्मा
४० - यशस्वी जैस्वाल*
४१ - गौतम गंभीर
४३ - सुनील गावस्कर
४८ - नवज्योतसिंग सिद्धू
४८ - मुरली विजय
४९ - शिखर धवन
५५ - केएल राहुल
संक्षिप्त धावफलक
भारत : पहिला डाव : ५८७, दुसरा डाव : १ बाद ६४
इंग्लंड : पहिला डाव : ४०७
इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील सर्वोच्च भागीदारी
३५० - इयान बेल आणि केविन पीटरसन, द ओव्हल, २०११
३१६ - गुंडप्पा विश्वनाथ आणि यशपाल शर्मा, चेन्नई, १९८२
३१४ - राहुल द्रविड आणि गौतम गंभीर, मोहाली, २००८
३०८ - ग्राहम गूच आणि अॅलन लँब, लॉर्ड्स, १९९०
३०३ - हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ, बर्मिंगहॅम, २०२५
इंग्लंडची खालच्या क्रमांकावरील सर्वाधिक भागीदारी
३९९ - जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन, २०१६
३३२ - स्टुअर्ट ब्रॉड आणि जोनाथन ट्रॉट विरुद्ध पाकिस्तान, लॉर्ड्स, २०१०
३०३ - हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ, बर्मिंगहॅम, २०२५