स्पेन : भीषण अपघातात लिव्हरपूलचा स्टार फुटबॉलपटू डायगो जोटा आणि त्याचा भाऊ ठार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
स्पेन : भीषण अपघातात लिव्हरपूलचा स्टार फुटबॉलपटू डायगो जोटा आणि त्याचा भाऊ ठार

झमोरा: पोर्तुगाल आणि लिव्हरपूल एफसीसाठी खेळणारा आघाडीचा फुटबॉलपटू डायगो जोटा (वय २८) आणि त्याचा भाऊ आंद्रे सिल्वा यांचा स्पेनमधील झमोरा परिसरात झालेल्या भीषण कार अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण फुटबॉलविश्वाला हादरवून टाकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोटा आपल्या विवाहानंतर पत्नी रुटे कार्डोसोसोबत हनिमूनसाठी निघाला होता. प्रवास करत असताना हा अपघात घडला. त्यांच्या सोबत कारमध्ये असलेला त्याचा भाऊ आंद्रे देखील यात ठार झाला. केवळ दहा दिवसांपूर्वीच, २२ जून रोजी जोटाचे पोर्टो येथे लग्न झाले होते. त्यांच्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टमध्येही त्याने आपल्या नवविवाहित आयुष्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.

फुटबॉल महासंघाने व्यक्त केला शोक

या दुर्घटनेनंतर पोर्तुगाल फुटबॉल महासंघाने अधिकृत निवेदन जारी करत जोटा आणि त्याच्या भावाच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. डायगो जोटा आणि आंद्रे सिल्वाचा मृत्यू हा पोर्तुगिज फुटबॉलसाठी अपूरणीय क्षती आहे, असे महासंघाने म्हटले आहे.

उत्कृष्ट कारकीर्द

डायगो जोटा याने आपल्या फुटबॉल कारकीर्दीत पाकोस डी फेरेरा, पोर्तो, वुल्वरहॅम्प्टन आणि लिव्हरपूल यांसारख्या प्रतिष्ठित क्लब्सचे प्रतिनिधीत्व केले आहे. २०२० मध्ये तो लिव्हरपूलसोबत जोडला गेला आणि १२३ सामन्यांत ४३ गोल करत महत्त्वपूर्ण यश संपादन केले. राष्ट्रीय पातळीवर त्याने ४९ सामने खेळून १४ गोल केले होते. २०२० मध्ये त्याचा पोर्तुगाल राष्ट्रीय संघात प्रवेश झाला होता आणि त्याने यूरो २०२०, फिफा वर्ल्ड कप २०२२ तसेच युरो २०२४ मध्ये भाग घेतला होता. जोटाच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली असून, जगभरातून चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.