प्रल्हाद पांडाला दुसऱ्यांदा विजेतेपद

सुसेगादो स्ट्राईक फाईट नाईट ३ : अमित कुमार उपविजेता

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
29th June, 11:52 pm
प्रल्हाद पांडाला दुसऱ्यांदा विजेतेपद

पणजी : मिरामर येथील क्लब टेनिस दे गास्पर डायस येथे पार पडलेल्या ‘सुसेगादो स्ट्राईक फाईट नाईट ३’ या रोमांचक बॉक्सिंग स्पर्धेत गोव्यातील प्रल्हाद पांडा यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत आयबीसी वेस्ट झोन फेदरवेट टायटल यशस्वीरित्या दुसऱ्यांदा जिंकून आपले विजेतेपद अबाधित राखले.
२९ वर्षीय प्रल्हाद पांडाने पुण्याच्या २७ वर्षीय अमित कुमारविरुद्ध आठ फेरींच्या अत्यंत कठीण आणि चुरशीच्या लढतीत आपले वर्चस्व सिद्ध करत, तिन्ही पंचांच्या एकमताने प्रभावी विजय मिळवला.
घरच्या मैदानावर आपला किताब अबाधित राखणे हा एक अत्यंत गर्वाचा आणि अविस्मरणीय क्षण आहे. गेल्या कित्येक वर्षांची सातत्याने घेतलेली मेहनत आणि त्यामागचे समर्पण याचेच हे फळ आहे. गोमंतकीय प्रेक्षकांसमोर पुन्हा रिंगमध्ये उतरून विजय मिळवणे, ही माझ्यासाठी खऱ्या अर्थाने मनाच्या तुऱ्याची अनुभूती होती, अशी प्रतिक्रिया विजयानंतर प्रल्हाद पांडांनी दिली.
ही स्पर्धा घडवण्यासाठी झालेली मेहनत आणि उत्साह प्रेरणादायी आहे. ही केवळ प्रतिभेला वाव देणारी नाही, तर समाजाला जोडणारीही संधी आहे, असे नाईक यांनी सांगितले.
‘फाईट नाईट ३’च्या सुरुवातीच्या लढतीत पंजाबच्या २२ वर्षीय मनिंदर सिंगने केवळ २ मिनिटे ५६ सेकंदांत पाँडिचेरीच्या ३० वर्षीय भरनी वेल्मुरुगनला पुरुष वेल्टरवेट गटात तांत्रिक नॉकआउटने हरवत झटपट विजय मिळवला. सुसेगादो स्ट्राईक फाईट नाईट ही प्रामाणिक लढती आणि व्यावसायिकतेद्वारे स्थानिक बॉक्सर्सना राष्ट्रीय मंच देणारी एक अभिमानास्पद संधी आहे, असे स्पर्धेचे सह- संस्थापक लुइगसन फर्नांडिस यांने सांगितले .
पुरुष हेवीवेट गटात आशीष अहलावतने अफगाणी मूळच्या ताहेर खुर्रमवर (२६) चार फेऱ्यांच्या कठीण लढतीनंतर विभाजित निर्णयाने विजय मिळवला. बॉक्सिंग हे आमचे खरे प्रेम आहे. फक्त स्पर्धा भरवायच्या नाहीत, तर गोव्यात प्रो-बॉक्सिंगचे एक मजबूत व्यासपीठ तयार करायचे आहे, हीच आमची दिशा आहे आणि त्यासाठी आम्ही सतत काम करत आहोत. येणाऱ्या चार महिन्यांत आमचे अ‍ॅनिव्हर्सरी फाईट नाईट होणार आहे आणि तिथून पुढे आम्ही आणखी मोठे स्वप्न पाहतोय, सहसंस्थापक प्रतीमेश नाईक म्हणाले. सर्व बॉक्सर्स हे राष्ट्रीय स्तराचा अनुभव असलेले नोंदणीकृत व्यावसायिक होते आणि मान्यताप्राप्त वजनी गटांनुसार त्यांची जुळवणी करण्यात आली होती. ही आतापर्यंतच्या सर्वोत्तम प्रो-बॉक्सिंग स्पर्धांपैकी एक होती, आयबीसी पश्चिम विभागाचे आयुक्त अजय साळवी म्हणाले.
प्रत्येक पात्र बॉक्सरला, लिंग भेद न करता, स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली पाहिजे. फायट नाईट ३ ने हे तत्त्व खरे करून दाखवले आहे," सहसंस्थापक क्लाईड लोबो म्हणाले. कार्यक्रमादरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी पॅरा टेबल टेनिसमधील देशातील क्रमांक १ खेळाडू लॉयड फर्नांडिस यांचा गौरव केला. ‘फाईट नाईट ३’मध्ये सहभागी झालेल्या बॉक्सर्सची झुंज पाहताना मला खूप आनंद झाला, असे लॉयड म्हणाले.
१२ बॉक्सर्सचा सहभाग
‘फाईट नाईट ३’च्या थरारक स्पर्धेत एकूण १२ बॉक्सर्सनी रिंगमध्ये आपली चमकदार कामगिरी सादर केली. पुरुष सुपर फ्लायवेट गटातील लढतीत गोमंतकीय कैलास गावस (३०) याने विरारच्या २२ वर्षीय प्रसाद कटनूरविरुद्ध चार फेऱ्यांची अत्यंत चुरशीची झुंज दिली. अखेर पंचांच्या विभाजित निर्णयातून कैलासने विजय संपादन करत आपल्या कौशल्याची छाप पाडली. या स्पर्धेचा अधिकृत वजन तपासणी समारंभ २७ जून रोजी पणजीतील ‘फिटनेस बार’ येथे उत्साही वातावरणात पार पडला. शनिवारी रात्री, प्रतिष्ठित मिरामार क्लबच्या ‘साला दे गॅस्पर’ सभागृहात प्रल्हाद पांडाच्या विजेतेपदाच्या लढतीसह सर्व लढती पार पडल्या. या थरारक कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.