जसप्रीत बुमराहचा पंजा, टीम इंडियाकडे ९६ धावांची आघाडी

तेंडुलकर-अँडरसन चषक : पहिली कसोटी रंगतदार स्थितीत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
22nd June, 11:56 pm
जसप्रीत बुमराहचा पंजा, टीम इंडियाकडे ९६ धावांची आघाडी

लीड्स : टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी आघाडी मोडीत काढण्यापासून रोखले. तिसऱ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात २ बाद ९० धावा केल्या असून इंग्लंडवर ९६ धावांची आघाडी घेतली आहे. भारताच्या दुसऱ्या डावात के.एल. राहुलने जबाबदारीने फलंदाजी करताना नाबाद ४७ धावा केल्या आहेत. त्याच्यासोबत कर्णधार शुभमन गिल ६ धावांवर नाबाद आहे.
दुसऱ्या डावात ब्रायडन कार्सेने यशस्वी जैस्वालला फक्त ४ धावांवर बाद करत पहिला झटका दिला. बेन स्टोक्सने साई सुदर्शनचा बळी घेत दुसरा धक्का दिला. क्रिस वोक्स आणि जोश टंगने किफायतशीर मारा करत दबाव राखला, मात्र त्यांना यश मिळाले नाही. शोएब बशीरने देखील संयमी मारा करत केवळ ११ धावा दिल्या.
भारतीय संघ सध्या भक्कम स्थितीत असून चौथ्या दिवशी आघाडी वाढवून इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. के.एल. राहुलच्या अनुभवी फलंदाजीकडून भारतीय संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल, तर शुभमन गिलसुद्धा मोठी खेळी करण्यासाठी सज्ज आहे.
सलामीवीर यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या तिघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. इंग्लंडने प्रत्युत्तरात १००.४ षटकात ४६५ धावा केल्या. इंग्लंडसाठी उपकर्णधार ओली पोप याने सर्वाधिक १०६ धावांची खेळी केली. तर इतरांनी चांगले योगदान दिले. हॅरी ब्रूक नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. तर ओपनर बेन डकेट याने अर्धशतकी खेळी केली. तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक ५ बळी घेतले. त्यामुळेच टीम इंडियाला ६ धावांची नाममात्र आघाडी घेता आली.
टीम इंडियाने शेवटचे ७ बळी ४१ धावांच्या मोबदल्यात गमावून मोठी धावसंख्या करण्याची संधी गमावली. त्यामुळे भारताचा पहिला डाव ४७१ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉली याचा अपवाद वगळता इतर सर्वांनी किमान दुहेरी आकडा गाठला. क्रॉलीने ४ धावा केल्या.
इंग्लंडसाठी ओली पोप याने १३७ चेंडूत १९६ धावा केल्या. पोपचे कसोटी कारकीर्दीतील नववे शतक ठरले. हॅरी ब्रूक यालाही शतक करण्याची संधी होती. मात्र तो दुर्देवी ठरला. हॅरी ११२ चेंडूत ९९ धावांवर बाद झाला. बेन डकेट याने ६२ धावांचे योगदान दिले. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याला मोठी खेळी करण्यापासून रोखण्यात भारताला यश आले. रुटने २८ धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्स याने २० धावा केल्या.
जेमी स्मिथ याने ४० तर ख्रिस वोक्सने ३८ धावांचे योगदान दिले. ब्रायडन कार्सने २२ तर जोश टंग याने ११ धावा केल्या. शोएब बशीर १ धावांवर नाबाद रा​हिला. तर टीम इंडियाकडून बुमराह व्यतिरिक्त प्रसिद्ध कृष्णा याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मोहम्मद सिराजने २ बळी​, तर रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकुर हे दोघे विकेट घेण्यात अपयशी ठरले.
दरम्यान टीम इंडियाकडून पहिल्या डावात शुबमन, ऋषभ आणि यशस्वी या तिघांव्यतिरिक्त एकालाही काही खास करता आले नाही. शुबमनने सर्वाधिक १४७ धावा केल्या. ऋषभने १३४ तर यशस्वीने १०१ धावा केल्या. तर केएल राहुलने ४२ धावा केल्या. तर इतरांनी निराशा केली. तर इंग्लंडकडून जोश टंग आणि बेन स्टोक्स या दोघांनी प्रत्येकी ४-४ बळी घेतले. तर शोएब बशीर आणि ब्रायडन कार्स या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
बुमराहने टाकले अक्रमला मागे
हेडिंग्ले कसोटीतील बळींसह बुमराहदक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या सेना देशांमध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणारा आशियाई गोलंदाज ठरला आहे. बुमराहने हा विक्रम आपल्या नावे करताच पाकिस्तान त्याने पाकिस्तानच्या वसीम अक्रमला मागे टाकत पहिले स्थान गाठले आहे. बुमराहने सेना देशांमध्ये आता सर्वाधिक १४७ बळी घेतले आहेत.

बुमराहने सेना देशांमध्ये ६० डावांमध्ये १४७ बळी घेतले आहेत. तर अक्रमने ५५ डावांमध्ये १४६ बळी घेतले होते. या दोघांनंतर माजी भारतीय कर्णधार आणि फिरकीपटू अनिल कुंबळे आहेत, ज्यांनी ६७ डावांमध्ये १४१ बळी घेतले. भारताचा इशांत शर्मा ७१ डावांमध्ये १३० बळींसह चौथ्या आणि मोहम्मद शमी ६३ डावांमध्ये १२३ बळींसह पाचव्या स्थानावर आहे.
या यादीत पुढे श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरनच्या नावे ३४ डावात १२० बळी आहेत. भारताचा झहीर खान ५३ डावांत ११९ बळींसह पुढच्या स्थानी आहे. तर कपिल देव यांच्या नावे ६२ डावांत ११७ बळी आहेत.बुमराहचे सेना देशांमधील बळी
बुमराहने ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत २३ डावांमध्ये गोलंदाजी करत ६४ बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत १५ डावांमध्ये ३८ बळी, इंग्लंडमध्ये १६ डावांमध्ये ३९ बळी आणि न्यूझीलंडमध्ये चार डावांमध्ये सहा बळी घेतले आहेत. बुमराहने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो टीम इंडियाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि सध्या तो कसोटीतील नंबर वन गोलंदाज आहे. त्याने कसोटीत एकूण २०७ बळी घेतले आहेत.
बुमराहची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी
जसप्रीत बुमराहने जॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, ख्रिस वोक्स आणि जोश टंग यांना माघारी धाडत ५ गडी बाद केले. जोश टंगला बाद करताच बुमराहने भारताबाहेर खेळताना सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १४ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. कपिल देव यांनी ६६ डावात हा कारनामा केला होता. तर जसप्रीत बुमराहने हा कारनामा ३४ व्या कसोटी सामन्यात करून दाखवला आहे. 

संक्षिप्त धावफलक
भारत : पहिला डाव : ४७१, दुसरा डाव : २ बाद ९०

इंग्लंड : पहिला डाव : ४६५