'कदंब'चा प्रवास ठरतोय त्रासदायक! ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका

बसमधील 'या' प्रकारानंतर 'गोवा कॅन' करणार ग्राहक मंचाकडे तक्रार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
'कदंब'चा प्रवास ठरतोय त्रासदायक! ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका

मडगाव : मागील काही काळापासून कदंबच्या बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना निरनिराळ्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. चार दिवसांपूर्वी मडगाव पणजी मार्गावरील बसला काचेऐवजी प्लास्टिक लावण्यात आले होते. आता मडगाव पणजी मार्गावरील शटल बसमधली सीटच गायब असल्याचे दिसून आले. याप्रकरणी 'गोवा कॅन'कडून दखल घेत जिल्हाधिकारी, वाहतूक खात्यासह ग्राहक मंचाकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कदंब महामंडळाकडून प्रवाशांसाठी 'माझी बस' योजना नव्या दमाने सुरू करण्यात आली आहे. मात्र, कदंब महामंडळाकडे बसची कमतरता असल्याने जुन्या बस दुरुस्ती करून पुन्हा प्रवाशांना आणण्यासाठी पाठवण्यात येत आहेत. प्रवाशांसाठी बस उपलब्ध करून देताना डेपोमध्ये त्यांची  तपासणी देखील होत नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

काचेऐवजी प्लास्टिक कापडाचा आधार
मडगाव ते पणजी मार्गावर धावणार्‍या कदंबच्या बसमध्ये २६ जून रोजी गाडीच्या खिडकीची काच फुटलेली होती. त्याजागी प्लास्टिकचे कापड लावण्यात आले होते. पावसाचे पाणी या कापडातून बसमध्ये येत असल्याने प्रवासी भिजण्याचा प्रकारही घडला होता. या घटनेनंतर नागरिकांनी आणि प्रवाश्यांनी कदंबच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केला होता.

मडगाव- पणजी बसमधल्या सीट गायब
या घटनेला अवघे काही दिवस उलटल्यानंतर आज सोमवारी पुन्हा एकदा मडगावहून पणजीच्या दिशेने सोडण्यात आलेल्या शटल बसमधल्या काही सीटच गायब असल्याचा प्रकार निदर्शनास आला. याची गोवा कॅनकडून दखल घेण्यात आलेली आहे. नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाकडे ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार केली जाणार आहे. याशिवाय दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व वाहतूक संचालनालयाकडेही ग्राहकांना होणार्‍या समस्येबाबत तक्रार केली जाणार असल्याचे गोवा कॅनच्या लोर्ना फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा