१० जुलै रोजी गोवा राखीव पोलीस दलाच्या मैदानात पार पडणार प्रक्रिया.
पणजी : गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून विविध सरकारी खात्यांतील एकूण १७० जुन्या गाड्यांच्या लिलावांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातील तब्बल १२८ गाड्या १५ वर्षांपूर्वीच्या असून उर्वरित ४२ गाड्या १५ वर्षांच्या आत वापरात आलेल्या आहेत. या वाहनांची लिलावाद्वारे विक्री १० जुलै रोजी गोवा राखीव पोलीस दलाच्या इमारतीजवळील गझेटेड ऑफिसर्स इन्स्टिट्यूटच्या सभागृहात पार पडणार आहे.
सामान्य जनतेला लिलावात सहभागी होता येणार
१५ वर्षांखालील ४२ वाहनांच्या लिलाव प्रक्रियेत सामान्य नागरिकांसाठी खुली आहे. त्यासाठी लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी १ ते ९ जुलै २०२५ दरम्यान सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.४५ या वेळेत संबंधित वाहनांचे स्थळ (लॉट) पाहणी करणे आवश्यक आहे. सर्व वाहनांना लॉट नंबर देण्यात आले असून त्याचाही उल्लेख आवश्यक आहे. तर १५ वर्षांहून जुनी असलेली १२८ वाहने केंद्र सरकारच्या स्क्रॅप धोरणानुसार वापरण्यास अयोग्य आहेत. त्यामुळे ही वाहने फक्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपींग सुविधा (RVSF) असलेल्या कंत्राटदारांनाच लिलावात खरेदी करता येणार आहे.
असा असेल लिलावाचा कार्यक्रम
१० जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान वाहनांसाठी ठरवलेल्या किमतींवर बोली लावण्यात येईल. त्यानंतर ३.३० वाजता लिलाव पेटी उघडण्यात येईल आणि सर्वाधिक बोली लावणाऱ्यांची निवड होईल. त्याच दिवशी संपूर्ण रक्कम भरल्यानंतर संबंधित व्यक्तीला वाहन ताब्यात देण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी फक्त २ गाड्यांपर्यंत बोली लावू शकतो.
गाड्यांची स्थिती व किमती
या लिलावात टोयोटा इनोव्हा (५०,००० ते १.५ लाख), रेनॉल्ट डस्टर (५०,००० ते ६०,००० ), होंडा सिटी, मारुती एसएक्स ४, फॉक्सवॅगन वेंटो, फोर्ड फिएस्टा (२४,००० ते ५५,०००) अशा चारचाकी गाड्या उपलब्ध आहेत. स्प्लेंडर आणि पल्सर सारख्या दुचाकींची सुरुवातीची किंमत ४,००० इतकी आहे.
पूर्व मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या शासकीय गाडीचाही लिलावात समावेश
या लिलावात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पूर्वी सरकारी कामासाठी वापरात दिली गेलेली महिंद्रा XUV300 (GA 11 G 0645) ही मोटारही समाविष्ट आहे. ही गाडी १५ वर्षांखालील असून ती लिलावात सामान्य नागरिकांसाठी खुली आहे. तिची किमान लिलाव किंमत १.२० लाख ठेवण्यात आली आहे.
लिलावात समाविष्ट असलेली वाहने ही 'या' खात्यांमधून
सामान्य प्रशासन, प्रोव्हेदोर, कोमुनिदाद प्रशासक कार्यालय, कृषी संचालनालय, उद्योग व वाणिज्य खाते, खादी व ग्रामोद्योग मंडळ, गोवा तियात्र अकादमी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यावरण व हवामान बदल खाते, पोलीस विभाग, जीएसआयडीसी, कला व संस्कृती संचालनालय, वीज खाते, राजभवन, नगरनियोजन, पुनर्वसन महामंडळ, इन्फोटेक महामंडळ, गोवा मानवी हक्क आयोग, गोवा फलोत्पादन महामंडळ आदी विविध विभागांतील आहेत.