'पीओपी गणेश मूर्ती नाकारा'! गोव्यात 'या' पंचायतीने काढली जाहीर नोटीस

पीओपीच्या मूर्ती नजरेस सुखावणाऱ्या जरी असल्या, तरी पर्यावरणावर गंभीर परिणाम होतातः सरपंच

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
'पीओपी गणेश मूर्ती नाकारा'! गोव्यात 'या' पंचायतीने काढली जाहीर नोटीस

म्हापसा :  हडफडे-नागवा पंचायतीने येत्या गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्ती खरेदी किंवा पूजन न करता पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मूर्तींचे पूजन करण्याचे आवाहन गावातील जनतेला केले आहे. 'निसर्ग-परंपरेला हो म्हणा आणि पीओपी मूर्तीं नाकारा', असा नारा देत सरपंच रोशन रेडकर यांनी सार्वजनिक सूचना नोटिस जारी केली आहे.

गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) (POP)  मूर्तींमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. सुंदर रंगसंगती व डिझाइन असलेल्या या मूर्ती नजरेस सुखावणाऱ्या जरी असल्या, तरी त्यांच्या परिणामांची खोली आपल्याला अनेकदा जाणवत नाही.

पीओपी हे नैसर्गिकरीत्या विघटनशील नाही. त्यामुळे मूर्तींचे विसर्जन पाण्यात केल्यावर त्या कित्येक कालावधी विघटन न होता तलाव, नदी आणि समुद्राच्या तळाशी साठून राहतात. यात वापरले जाणारे रासायनिक रंग (chemical dyes) आणि सजावटीचे साहित्य देखील जलचरांच्या आरोग्यावर परिणाम करतात. मासे, जलवनस्पती आणि जैवविविधतेचा संपूर्ण परिसंस्थाच यामुळे संकटात येते. परिणामी अशा मुर्ती नाकारा असे जाहीर आवाहन हडफडे-नागवा पंचायतीने नोटिशीद्वारे केले आहे.

'निसर्गाला, परंपरेला हो म्हणा आणि पीओपी मूर्तींना नाकारा', अशी प्रतिज्ञा घेऊया, असे आवाहन या नोटीसीद्वारे केले आहे शिवाय, जर कुणी पीओपी मूर्तींचे विक्री किंवा पूजन करताना आढळल्यास, अशा दोषीवर पंचायत (Panchayat) मूर्तीच्या आकारानुसार ५००० ते १०,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल असा इशाराही नोटीसीद्वारे पंचायतीने दिला आहे.

हेही वाचा