ॲसिड हल्ल्याचे दोडामार्ग कनेक्शन

एकाला अटक; सुडाचे प्रकरण असण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
ॲसिड हल्ल्याचे दोडामार्ग कनेक्शन

पेडणेः धारगळ-पेडणे येथील सुकेकुळण परिसरात आज सकाळी घडलेल्या ॲसिड हल्ल्याचे कनेक्शन महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्याशी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी (Police) कळणे दोडामार्ग येथील नीलेश गजानन देसाई यास अटक केली आहे.

या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी ७.५०च्या दरम्यान अज्ञात दुचाकीस्वारांनी केलेल्या ॲसिड हल्ल्यात ऋषभ उमेश शेट्ये (१७) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत आहे.

ऋषभ म्हापशातील (Mapusa) उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत असून आज सकाळी ७.५०च्या दरम्यान तो सुकेकुळण- धारगळ येथे बसची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकट्याने त्याच्यावर ॲसिड फेकले.

या हल्ल्यात दोडामार्ग तालुक्यातील एका व्यक्तीचा हात असण्याची शक्यता वर्तवली होती. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका गंभीर घटनेचा सूड घेण्याचा हा प्रकार असावा असे पोलिसांना वाटते. सर्व बाजूंनी केलेल्या चौकशीअंती गोवा पोलिसांनी कळणे दोडामार्ग येथील नीलेश गजानन देसाई यास अटक केली आहे.

या संपूर्ण घटनेला एका अर्धवट राहिलेल्या प्रेम प्रकरणाच्या सुडाची किनार असल्याची शक्यता असून पोलीस लवकरच या घटनेबाबत खुलासा करणार आहेत.

हेही वाचा