अग्निशामक दल, बचाव पथक घटनास्थळी दाखल, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
संगारेड्डीः तेलंगणातील हैदराबादजवळील संगारेड्डी जिल्ह्यातील पशामिलाराम औद्योगिक वसाहतीतील सिगाची केमिकल इंडस्ट्रीमध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती हाती येतेय. रिअॅक्टरमध्ये अचानक स्फोट झाल्यामुळे ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे २५ कामगार गंभीर आहेत. या स्फोटमुळे (Telangana Blast) कारखान्यात आग लागली आहे. अग्निशामक दल, बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून आगीत अडकलेल्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
या कारखान्यात झालेला स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटामुळे अनेक कामगार जखमी झाले. तर काहीजण स्फोटामुळे उडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले असूनअधिकाऱ्यांना कारखान्यातील सर्व कामगारांना वाचवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
मृतांचा आकडा वाढू शकतो
अग्निशमन दलाचे महानिरीक्षक व्ही. सत्यनारायण यांनी सांगितले की, ढिगाऱ्यातून पाच कामगारांचे (labour) मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तर १३ कामगारांना वाचवण्यात आले आहे. याशिवाय २० हून अधिक कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. तसेच, ढिगाऱ्यात अनेक लोक अडकल्याचे वृत्त आहे. स्फोटाचे कारण अद्याप कळलेले नाही. अणुभट्टीमध्ये अचानक जलद रासायनिक अभिक्रियेमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उत्पादनांची ६५ देशांमध्ये निर्यात
सिगाची इंडस्ट्रीज फार्मास्युटिकल (Medical factory) पावडर बनवते. ते १९८९ पासून मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज (एमसीसी) बनवत आहे. ही पांढऱ्या रंगाची पावडर आहे. त्याला वास किंवा चव नाही. एमसीसीचा वापर औषध आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगांमध्ये केला जातो. सिगाची इंडस्ट्रीजचे हैदराबादसह देशभरात पाच कारखाने आहेत. कंपनीची उत्पादने ६५हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात. कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर, सिगाची इंडस्ट्रीजचे शेअर्स मुंबई शेअर बाजारात ९.८९ टक्क्यांनी घसरल्याचेही वृत्त आहे.
याआधीही स्फोटाच्या घटना
सांगारेड्डी आणि पशामीलाराम औद्योगिक पट्ट्यात अलिकडच्या काळात अणुभट्टीशी संबंधित अनेक अपघात झाले आहेत. यापूर्वी संगारेड्डी फार्मा प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि १४ जण जखमी झाले होते. २०२३ मध्ये पशामीलाराम येथे झालेल्या आणखी एका स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.