उस्मानाबाद-पणजी एसटीचा गोव्याच्या सीमेवर भीषण अपघात

१९ प्रवासी जखमी, बांदा - पानवळ येथे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
8 hours ago
उस्मानाबाद-पणजी एसटीचा गोव्याच्या सीमेवर भीषण अपघात

पणजीः उस्मानाबादहून पणजीच्या दिशेने निघालेल्या हिरकणी या एसटी बसचा ३० जून रोजी सकाळी गोवा सीमेलगतच्या बांदा, पानवळ गावातील वळणावर भीषण अपघात (Fatal accident) घडला. समोरून येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसची आणि उस्मानाबादहून आलेल्या हिरकणी बसची समोरासमोर धडक बसली. या अपघातात चालक, वाहक आणि विद्यार्थ्यांसह (Student) एकूण १९ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी गावातून बांद्याच्या दिशेने येणारी एसटी आणि उस्मानाबादहून पणजीच्या दिशेनं निघालेली एसटी पानवळ गावाजवळील एका वळणावर येताच फुकेरीहून आलेल्या बस चालकाने बस कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही एसटी (ST Bus) समोरासमोर धडकल्या. या अपघातात फुकेरीची एसटी १०० फूटापर्यंत फरफटत गेली. यामध्ये दोन्ही बसच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Hospital) उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने तातडीने मदत मिळाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या अपघातात चालक, वाहक आणि विद्यार्थ्यांसह एकूण १९ प्रवासी जखमी झाले आहेत.

दोन्ही बस रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे पानवळ परिसरात काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर तातडीने पोलिसांनी (Police) आणि एसटी प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. सध्या अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून, काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती आहे. हा अपघाताचा पुढील तपास पोलीस आणि एसटी प्रशासन करत आहे.

हेही वाचा