दोघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
सावंतवाडी : सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा तिलारी घाटमार्ग सध्या धोकादायक अवस्थेत असून, या मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी दुपारी बेळगावहून तिलारीच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोचे ब्रेक फेल होऊन टेम्पो १०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस हवालदार विजय जाधव व किरण आडे यांनी घटनास्थळ गाठत गाडीत अडकलेल्या दोघांना बाहेर काढले व स्वतःच्या वाहनाने चंदगड रुग्णालयात दाखल केल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या अपघाताबाबत सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.
या मार्गावर अनेकवेळा मोठ्या वाहनांचे अपघात झालेत. मात्र वेळोवेळी अशा वाहनांना घाटातून प्रवेश बंद करण्यात यावा अशी मागणी करुनही दुर्लक्ष केले जात असल्याने अपघात सत्र कायम आहे. त्यातच रस्त्याचे अर्धवट डांबरीकरणाचे काम, वळणावळणांचे रस्ते, कोसळणाऱ्या दरडी, तीव्र चढ-उतार यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. घाटात रस्त्याच्या कडेला सावधगिरीसाठी सूचना फलक, रिफ्लेक्टर यांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे.