ओडिशा : पुरीत श्री गुंडिचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी

मृतांमध्ये दोन महिला; सहा जणांची प्रकृती चिंताजनक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th June, 10:17 am
ओडिशा : पुरीत श्री गुंडिचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी

पुरी  : जगन्नाथ रथयात्रे दरम्यान पुरी जिल्ह्यातील श्री गुंडिचा मंदिराजवळ रविवारी पहाटे भीषण चेंगराचेंगरी  झाली. या दुर्घटनेत किमान तीन भाविकांचा मृत्यू झाला असून सुमारे ५० भाविक जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे चारच्या सुमारास मोठ्या संख्येने भाविक मंदिर परिसरात जमले असताना अचानक ही घटना घडली.

पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ एस. स्वैन यांनी सांगितले की, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख बसंती साहू (बोलागड), प्रेमकांत मोहंती आणि प्रवाती दास (दोघेही बालिपटना) अशी झाली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. घटनेच्या चौकशीला सुरुवात झाली असून परिसरात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

रथयात्रेदरम्यान उष्माघातामुळे ६२५ जण आजारी

यापूर्वी शुक्रवारच्या रथयात्रेदरम्यान उष्णतेचा तडाखा बसल्याने आणि गर्दीमुळे तब्बल ६२५ भाविकांची तब्येत बिघडली होती. यामध्ये अनेकांना चक्कर, उलट्या आणि दम लागण्याच्या तक्रारी होत्या. त्यातील काही भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बहुतेक जणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.


जगप्रसिद्ध रथयात्रा जून-जुलै महिन्यात होते


दरवर्षी जून-जुलै महिन्यात पुरीत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची भव्य रथयात्रा काढली जाते. ही यात्रा मुख्य मंदिरातून सुरुवात करून श्री गुंडिचा देवीच्या मंदिरात (देवी गुंडिचा म्हणजेच भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची मावशी ) येथे पोहोचते. यावेळी लाखो भाविक रथ ओढण्यासाठी पुरीत दाखल होतात.

हेही वाचा