'कांटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; अवघ्या ४२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टीव्ही, चित्रपटसृष्टीत शोककळा; हृदयविकाराचा झटका आल्याची सूत्रांची माहिती

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th June, 10:26 am
'कांटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; अवघ्या ४२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबईः टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी आली आहे. 'बिग बॉस १३' फेम अभिनेत्री, मॉडेल आणि 'काटा लगा' फेम शेफाली जरीवाला (shefali jariwala) हिचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने तिने अखेरचा श्वास घेतला. शेफालीच्या मृत्यूची माहिती सर्वप्रथम विरल भयानी यांच्या इंस्टाग्राम पोस्टमधून प्रसारित करण्यात आली. कुटुंबाने अद्याप यावर कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.


शेफाली मुंबईतील अंधेरी लोखंडवाला भागात राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक तिच्या छातीत दुखू लागल्याने तिचे पती पराग त्यागी यांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचारादरम्यान तिचे निधन झाले. 'कांटा लगा गर्ल' (kaanta laga girl) म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेफालीने अक्षय कुमार आणि सलमान खानसोबत 'मुझसे शादी करोंगी' चित्रपटात देखील काम केले होते.


लोकप्रिय कारकिर्द
१५ डिसेंबर १९८२ रोजी अहमदाबादमध्ये जन्मलेल्या शेफालीने अनेक रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. 'नच बलिये ५' आणि 'नच बलिये ७' मध्ये ती सहभागी झाली होती. २०१९ मध्ये ती सलमान खानच्या प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस १३' (bigg boss 13) मध्ये दिसली. याशिवाय २०१८ मध्ये तिने 'बेबी कम ऑन' या वेब सिरीजमध्येही मुख्य भूमिकेत काम केले होते. तिच्या नृत्यामुळेही ती चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होती. २०२४ मध्ये 'शैतानी रश्मे' या टीव्ही शोमध्ये पडद्यावर ती शेवटची झळकली होती.


हेही वाचा