पणजी : डबल इंजिन सरकारमुळे गोव्याची सर्वांगीण प्रगती : शहानवाज हुसेन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
पणजी : डबल इंजिन सरकारमुळे गोव्याची सर्वांगीण प्रगती : शहानवाज हुसेन

पणजी : गोवा हे एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ असून, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून राज्याची सर्वच क्षेत्रात प्रगती होत आहे, असे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन यांनी व्यक्त केले. धार्मिक, पर्यटन आणि विकासाचे उत्तम संतुलन गोव्यात दिसते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

हुसेन यांनी पणजीतील महालक्ष्मी मंदिरात भेट दिली. यावेळी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईकही त्यांच्या समवेत होते. श्री महालक्ष्मी मंदिरात कुंकूमार्चन महायज्ञ सुरू आहे. हुसेन यांनी मंदिर परिसरातून भाजप कार्यालयापर्यंत पायी चालत जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

गोव्यावरील प्रेमामुळे वारंवार भेटी

गोव्याचे निसर्गसौंदर्य आणि इथली संस्कृती मला खूप भावते. मी अनेकदा गोव्यात येतो. गोव्याच्या प्रेमापोटी काही पर्यटक दर महिन्याला येथे भेट देतात, असे सांगताना त्यांनी राज्यातील आध्यात्मिक पर्यटन वाढीस लागल्याचे नमूद केले. कुंकूमार्चन यज्ञासारखे धार्मिक विधी आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणारे असल्याचेही त्यांनी सांगितले.

डबल इंजिन सरकारमुळे पर्यटनाला गती

राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने गोव्यात पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या विकासासाठी एकत्रित काम करत आहेत. त्यामुळे पर्यटन, पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मिती यामध्ये चांगली कामगिरी झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सध्या दिल्लीत सुरू असलेली भेट, संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदल आणि अन्य राजकीय घडामोडींबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता, या विषयांबाबत मला कोणतीही माहिती नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया शहानवाज हुसेन यांनी दिली. या भेटीदरम्यान त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला आणि आगामी काळात पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वासही व्यक्त केला.


हेही वाचा