केपे : मानवी वस्तीत शिरला बिबट्या; कुत्र्याच्या भुकण्याने घाबरला आणि ठोकली धूम!

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
9 hours ago
केपे : मानवी वस्तीत शिरला बिबट्या; कुत्र्याच्या भुकण्याने घाबरला आणि ठोकली धूम!

मडगाव : बाळ्ळी गावातील देऊळवाडा परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फळदेसाई यांच्या घराजवळ लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या असून तो थेट घराच्या दिशेने येताना दिसून आला. मात्र, दरवाज्यावर असलेल्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे घाबरून बिबट्या तेथून पळून गेला.



या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी केली. याआधी मार्च २०२३ मध्येही बाळ्ळी परिसरात ब्लॅक पँथरचा वावर आढळून आला होता. त्यावेळी कमलाकर नायक यांच्या घराजवळील सीसीटीव्हीमध्ये काळा बिबट्या फिरताना दिसून आला होता. त्या वेळी परिसरातील कुत्रे व मांजरे अचानक गायब होऊ लागल्याने नागरिकांनी संशय घेत सीसीटीव्ही बसवले होते. सीसीटीव्ही फुटेज वन विभागाला दिल्यानंतर त्यांनी पिंजरा लावून त्या ब्लॅक पँथरला पकडून जंगलात सोडले होते.




आता पुन्हा एकदा बिबट्या मानवी वस्तीत शिरल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरे लावण्याची आणि बिबट्याला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी केली आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा