थर्ड अंपायरचे तब्बल ५ वादग्रस्त निर्णय : विंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी भडकले
ब्रिजटाऊन :ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात थर्ड अंपायर एड्रियन होलस्टॉक यांच्या पाच वादग्रस्त निर्णयांमुळे सामना चांगलाच गाजत आहे. विशेषतः चार निर्णय वेस्ट इंडिजच्या विरोधात गेल्यामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक डेरेन सॅमी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सामन्यातील दोन दिवसांमध्ये २४ बळी गेले असून, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १८० धावा केल्या, तर वेस्ट इंडिजचा संघ १९० धावांत गडगडला. अखेरचे वृत्त आले तेव्हा ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी लंचब्रेकपर्यंत ५ बाद १८१ धावा केल्या होत्या आणि ते १७१ धावांनी आघाडीवर होते. मात्र मैदानावरील खेळापेक्षा थर्ड अंपायरच्या निर्णयांची अधिक चर्चा झाली.
दरम्यान, वेस्टइंडीज संघाचा वेगवान गोलंदाज जायडेन सील्स याच्यावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर केली आहे. आयसीसीने जायडेन सील्सच्या सामन्याच्या मानधनात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच त्याच्या नावावर एक डिमेरिट पॉइंटही जोडला आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याची विकेट घेतल्यानंतर सील्सने ज्या प्रकारे आक्रमक सेलिब्रेशन केले, त्यामुळे आयसीसीने ही कारवाई केली आहे. त्याचबरोबर जायडेन सील्सने सुद्ध आपली चूक मान्य केली आहे. सील्सने आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल-१ नियमांचे उल्लंघन केले, ज्यामुळे त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे. गेल्या २४ महिन्यांत सील्सच्या खात्यात हा दुसरा डिमेरिट पॉईंट आहे. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातही त्याला आयसीसीकडून ताकीद देण्यात आली होती आणि एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला होता.
पॅट कमिन्सचा विक्रम
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने वेस्टइंडीजविरुद्ध पहिल्या डावात दोन विकेट्स घेतल्या. यासह, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार म्हणून सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू बनण्याचा मान त्याने मिळवला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रिची बेनॉडच्या नावावर होता. पॅट कमिन्सने बेनॉडचा सुमारे ६३ वर्षांचा विक्रम मोडला. वेस्टइंडीजच्या रोस्टन चेसला बाद करताच कमिन्सने हा विक्रम आपल्या नावावर केला. आता पॅट कमिन्सने कर्णधार म्हणून १३९ विकेट्स घेतल्या असून, हा ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आहे. जगभरातील कर्णधारांचा विचार केला तर कर्णधार म्हणून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज इम्रान खान आहे. १९९२ मध्ये पाकिस्तानसाठी एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा कर्णधार इम्रान खानने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये १८७ विकेट्स घेतल्या आहेत. हे खरे आहे की सध्या पॅट कमिन्स इम्रान खानपासून खूप मागे आहे, पण पॅटला हे अंतर कमी करण्यास जास्त वेळ लागणार नाही.
वादग्रस्त निर्णयांचा पूर
ट्रॅव्हिस हेडचा झेल नाकारला
शमर जोसेफने टाकलेला एक चेंडू ट्रॅव्हिस हेडच्या बॅटला लागून थेट यष्टीरक्षक शाई होपच्या हातात गेल्याचे दिसले. मैदानी पंचांनी थर्ड अंपायरकडे झेलाची खातरजमा करण्यासाठी विचारणा केली. पहिल्या रिप्लेमध्ये स्पष्ट झेल दिसत होता, पण दुसऱ्या अँगलमधून थोडा संभ्रम निर्माण झाला. थर्ड अंपायरने ‘स्पष्ट पुरावा नाही’ म्हणत हेडला नाबाद दिले.
रोस्टन चेजचा एलबीडब्ल्यू
जोश हेजलवूडच्या चेंडूवर रोस्टन चेज पूर्णपणे बीट झाला होता. अपील नाकारले गेले, परंतु ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतला. बॉल पहिले पॅडला लागला का बॅटला, यावर संशय होता. थर्ड अंपायरने पहिला संपर्क गृहित धरत मैदानावरील निर्णय कायम ठेवला. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या विरोधात गेला.
पुन्हा चेजचा एलबीडब्ल्यू - अल्ट्रा एज स्पाईक असूनही आऊट
५०व्या षटकात चेज पुन्हा एकदा एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आले. रिव्ह्यूमध्ये अल्ट्रा एजवर स्पष्ट स्पाईक दिसत होता, तरीही अंपायर होलस्टॉकने निर्णय कायम ठेवत चेजला माघारी पाठवले.
शाई होपचा वादग्रस्त झेल
५८व्या षटकात होपच्या झेलावर सर्वाधिक वाद झाला. रिप्लेमध्ये चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचे स्पष्ट दिसूनही, थर्ड अंपायरने 'क्लीन कॅच' म्हणून निर्णय दिला.
कॅमेरन ग्रीन नाबाद
दुसऱ्या डावात कॅमेरन ग्रीनच्या पॅडला चेंडू लागल्यावर वेस्ट इंडिजने रिव्ह्यू घेतला. अल्ट्रा एजमध्ये स्पाईक दिसत होते, पण थर्ड अंपायरने बॉल बॅटला लागल्याचा निष्कर्ष काढून निर्णय बदलला नाही.
प्रशिक्षक डॅरेन सॅमी निराश
कोणत्याही अंपायरविषयी शंका वाटणे हे आम्हाला नको आहे. पण एकाच संघाविरोधात पाच निर्णय जात असतील, तर प्रश्न उभे राहणारच. आम्ही आमच्या बाजूने काही चुका केल्या आहेत, काही झेलही सुटले आहेत. पण या वादग्रस्त निर्णयांचा सामना करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. तरीही आमची टीम अजूनही सामन्यात टिकून आहे आणि विजयासाठी प्रयत्न करत आहे.
ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू
पॅट कमिन्स: १३९ विकेट्स
रिची बेनॉड: १३८ विकेट्स
बॉब सिम्पसन: ४१ विकेट्स
इयान जॉनसन: ३९ विकेट्स
मॉन्टी नोबल: ३१ विकेट्स