हेडिंग्ले कसोटीत पंचांशी वाद घातल्याबद्दल एक डिमेरिट पॉईंट
लिड्स : भारताचा उपकर्णधार आणि यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दणका दिला आहे. इंग्लंडविरुद्ध हेडिंग्ले कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर पंचांशी चेंडू बदलण्यावरून वाद घातल्याबद्दल त्याला एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे.
ही घटना इंग्लंडच्या डावातील ६१ व्या षटकात घडली. मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी आला असताना, तिसऱ्या चेंडूनंतर जसप्रीत बुमराहने पंचांकडे चेंडूबद्दल तक्रार केली. त्याने पंचांना चेंडू 'गेज'मध्ये (आकार मोजण्याचे उपकरण) टाकून तपासण्यास सांगितले. मात्र, चेंडू गेजमध्ये उत्तीर्ण झाला. यानंतर, हॅरी ब्रूकने षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार मारला. या घटनेनंतर, पंतने दुसऱ्या पंचांकडेही चेंडूबद्दल तक्रार केली. चेंडू पुन्हा गेज चाचणीत उत्तीर्ण झाला, परंतु पंत यावर चिडलेला दिसत होता. रागाच्या भरात त्याने चेंडू फेकून दिला.
आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन
आयसीसीच्या माहितीनुसार, पंतने आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल-१ चे उल्लंघन केले आहे. या उल्लंघनासाठी त्याला डिमेरिट पॉइंट दिला गेला असला तरी, त्याला कोणताही आर्थिक दंड आकारण्यात आलेला नाही. गेल्या २४ महिन्यांच्या कालावधीतील पंतचा हा पहिलाच गुन्हा होता. जर एखाद्या खेळाडूला २४ महिन्यांच्या आत ४ डिमेरिट पॉइंट्स मिळाले, तर त्याला एका सामन्यासाठी निलंबित केले जाते. पंतने आपली चूक मान्य केली असून, आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी लादलेली शिक्षा त्याने स्वीकारली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पंतला भविष्यात अधिक सावध राहावे लागणार आहे, कारण आणखी डिमेरिट पॉइंट्स मिळाल्यास त्याला निलंबनाचा सामना करावा लागू शकतो.
आयसीसी आचारसंहितेचे नियम काय सांगतात?
- आयसीसीच्या आचारसंहितेनुसार, लेव्हल-१ आणि लेव्हल-२ च्या उल्लंघनावर १ ते २ डिमेरिट पॉइंट्स आणि सामना शुल्काच्या शून्य ते ५० टक्के दंड आकारला जातो.
- लेव्हल-३ च्या उल्लंघनामुळे ६ कसोटी आणि १२ एकदिवसीय सामन्यांचे निलंबन होऊ शकते.
- जर एखाद्या खेळाडूने २४ महिन्यांत चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट्स जमा केले, तर ते निलंबन पॉइंट्समध्ये बदलतात. त्यानंतर खेळाडूला एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा दोन टी-२० सामन्यांसाठी बंदी घातली जाऊ शकते.
- डिमेरिट पॉइंट्स २४ महिन्यांपर्यंत खेळाडूच्या रेकॉर्डवर राहतात, त्यानंतर ते काढून टाकले जातात.