कोलवाळ कारागृह सुरक्षा यंत्रणेत ‘ब्लेम गेम’चे शीतयुद्ध

Story: अंतरंग- उत्तर गोवा |
29th June, 11:56 pm
कोलवाळ कारागृह सुरक्षा यंत्रणेत ‘ब्लेम गेम’चे शीतयुद्ध

को लवाळ कारागृहाचे सुरक्षा कवच असलेले तुरुंग प्रशासन आणि भारतीय राखीव दल (आयआरबी) पोलीस विभाग यांच्यात कारागृहाच्या सुरक्षेपेक्षा ‘ब्लेम गेम’चे शीतयुद्धच सध्या सुरू आहे. याचा फायदा उठवत ड्रग्ज तस्करीसह इतर गुन्हेगारी कारवाया कैद्यांकडून सुरूच आहेत. परवाची गोळा फेक गांजा तस्करी आणि गोशाळेतील मद्य पार्टी यावरून कारागृह सुरक्षा यंत्रणेतील ‘ब्लेम गेम’चा प्रकार सार्वजनिक झाला आहे.

कैद्यांमध्ये सुधारणा होऊन या कारागृहाचे सुधारगृहात रूपांतर व्हावे, हा हा कारागृह उभारणीमागे सरकारचा उद्देश होता. मात्र गेल्या १० वर्षात या कारागृहाची वाटचाल ही सुधारगृहाच्या दिशेने न होता राज्यातील गुन्हेगारीचे ते प्रमुख केंद्र म्हणून उदयास येताना दिसत आहे.    

हा कारागृह सुरू झाल्यापासून भांग पार्टी, अश्पाक बेंगरे खून, रावण वध, सततची सुरू असलेली ड्रग्ज, मोबाईल, तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी व धमकीद्वारे खंडणी वसुली, सुरक्षा यंत्रणेच्या हातावर तुरी देऊन पलायन, प्राणघातक हल्ले, फिल्मी स्टाईल व्हिडिओगिरी यासारखे अनेक गुन्हेगारी प्रकार कारागृहातील कैद्यांकडून घडलेले आहेत. किंबहुना कैद्यांना गुन्हेगारीसाठी कारागृह हेच सुरक्षित स्थान म्हणून वाटू लागले असून यात त्यांना कारागृह कर्मचारी, आयआरबी पोलीस, गृहरक्षक, सुरक्षारक्षक, समुपदेशक यांच्याबरोबरच नातेवाईक आणि मित्रांची मदत मिळालेली आहे. यामुळे राज्य प्रशासनाचे कारागृहाला सुधारगृह बनवण्याचे स्वप्न भंग पावले आहे.        

घरचे जेवण आणि फळांच्या माध्यमातून ड्रग्ज, मोबाईल व इतर वस्तूंची तस्करी होत असल्याने हे पदार्थ कारागृहात आणण्यास काही महिन्यांपूर्वीच प्रतिबंध घातले गेले. त्यापूर्वी फ्रिक्सिंग (तपासणी) गेटवर आयआरबी पोलीस व कारागृह कर्मचार्‍यांची तपासणी करण्यासाठी दोन्ही कर्मचार्‍यांनी पथके तैनात करण्यात आली. त्यामुळे कारागृहात प्रतिबंधित असलेल्या वस्तूंच्या तस्करीला आळा बसला.

या वस्तू मिळत नसल्याने कैद्यांनी त्या मिळवण्याच्या अनेक मार्ग शोधले. त्यातून ड्रग्जचे गोळे करून प्लास्टिकमध्ये गुंडाळून कारागृहात फेकणे, तस्करीसाठी ड्रोन, गोफणचा  वापर देखील कैद्यांकडून होत आहे.

एखादा तस्करीचा प्रकार आढळून आल्यावर कारागृह सुरक्षा यंत्रणा असलेली तुरुंग कर्मचारी आणि आयआरबी पथक एकमेकांकडे बोट दाखवतात. हल्लीच झालेल्या गांजा तस्करी आणि दारू पार्टीमधून तर हा ‘ब्लेम गेम’चा प्रकार जगजाहीर झाला आहे. हा ‘ब्लेम गेम’चा प्रकार कारागृह सुरक्षेसह राज्य गृह खात्यासाठी धोक्याचा संकेत ठरू शकतो. तुरुंगाची अंतर्गत सुरक्षा ही कारागृह प्रशासनाकडे आहे, तर बाहेरील सुरक्षा ही आयआरबी पोलीस विभागाकडे आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप न करता या दोन्ही सुरक्षा यंत्रणांनी कारागृहाला सुधारगृहाचे स्वरूप देण्याचा सरकारचा उद्देश सफल कसा होईल, आणि कारागृहातील अवैध प्रकार आटोक्यात आणून कैद्यांना सुधारण्याच्या दृष्टिकोनातून योजना आखणे गरजेचे आहे.

- उमेश झर्मेकर