राज्यात कडी आणि विसावदर या दोन विधानसभा मतदारसंघांत १९ जून रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. या पोटनिवडणुकांचा निकाल २३ जून रोजी जाहीर करण्यात आला. कडी मतदारसंघात भाजपने, तर विसावदर मतदारसंघात आम आदमी पक्षाने (आप) विजय नोंदवला. कडी आणि विसावदर मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यात अनुक्रमे भाजप आणि ’आप’ला यश आले. सर्वप्रकारे प्रयत्न करूनही विसावदर मतदारसंघात १८ वर्षांनंतर विजय मिळवण्याचे भाजपचे स्वप्न मात्र पुन्हा भंग पावले.
२०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विसावदर मतदारसंघातून आपचे उमेदवार भूपेंद्र भयानी यांनी विजय नोंदवला होता. मात्र फेब्रुवारी २०२३ मध्ये भयानी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळेच या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागली. पोटनिवडणुकीत मतदारांनी पुन्हा आपच्या उमेदवाराच्या पारड्यातच मतांचे भरभरून दान टाकले. विसावदरमध्ये आपचे गोपाल इटालिया यांनी भाजपच्या किरीट पटेल यांचा पराभव केला. कडी मतदारसंघात भाजपच्या राजेंद्र चावडा यांनी दणदणीत विजय मिळवला आणि पारंपरिक मतदारसंघावर विजयी ध्वज फडकावला.
विसावदर मतदारसंघ भाजपसाठी आव्हानात्मक ठरला आहे. या जागेवर भाजपला शेवटचा विजय २००७ मध्ये मिळाला होता. २००७ मध्ये भाजपच्या भलाला कुनभाई यांनी ४५.६ टक्के मते मिळविली होती. त्यानंतर मात्र ही जागा भाजपला जिंकता आलेली नाही.
विसावदर जागेवर २००२ आणि २००७ मध्ये भाजपने विजय मिळवला होता. २०१२ मध्ये गुजरात जनता पक्ष, २०१७ मध्ये काँग्रेस, तर २०२२ मध्ये आप विजयी ठरला होता. आता पोटनिवडणुकीतही आपनेच बाजी मारली.
या पोटनिवडणुकीत आपचे गोपाल इटालिया यांना ७५,९४२ (५१.०४ टक्के) मते मिळाली. भाजपच्या किरीट पटेल यांना ५८,३८८ (३९.२४ टक्के), तर काँग्रेसच्या नितीन रणपारिया यांना ५,५०१ मते मिळाली.
राज्याची सत्ता सातत्याने भाजपकडे आहे. लोकसभा निवडणुकीतही सर्व मतदारसंघांत भाजपचाच एकहाती विजय होतो. तरीही १८ वर्षांपासून विसावदर विधानसभा मतदारसंघात ‘कमळ’ फुललेले नाही. विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत येथून ‘आप’ने बाजी मारली; मात्र डिसेंबर २०२३ मध्ये येथील आमदाराने राजीनामा देऊन ‘कमळ’ हाती धरले. आता तरी मतदारसंघात विजय मिळवता येईल, अशी भाजपची अपेक्षा होती. मात्र मतदारांनी भाजपच्या विजयाची प्रतीक्षा आणखी लांबवली आहे. देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये विसावदरच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून होते. या जागेवर आपने विजय नोंदवून गुजरातमधील आपले वजन वाढवले आहे.
- प्रदीप जोशी,
(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)