तुरुंग ड्रग्जमुक्त करा!

आयआरबी, तुरुंग सुरक्षा रक्षक, होमगार्ड, अन्य सुरक्षा रक्षक असे प्रचंड सुरक्षा जाळे असतानाही ड्रग्ज तुरुंगात पोहचतात. इथली ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी ड्रोन डिटेक्शनसह मोबाईल जॅमर सक्रिय करणे, सुरक्षा यंत्रणेत वाढ करणे, तुरुंगाच्या भिंतीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा गोष्टींची अंमलबजावणी होण्याची गरज आहे.

Story: संपादकीय |
26th June, 11:45 pm
तुरुंग ड्रग्जमुक्त करा!

भारतात तुरुंगात चालणारे ड्रग्जचे व्यवहार नवे नाहीत. त्यातल्या त्यात ड्रग्जचे सेवन आणि विक्री करणारेच गुन्हेगार तुरुंगात असतील तर हे व्यवहार तुरुंगात आणि बाहेर एकाच वेळी सुरू राहतात. गोव्यातील कोलवाळ तुरुंगात ड्रग्ज सापडणे हेही आता नेहमीचे झाले आहे. कैद्यांना गांजा, चरस आणि अन्य ड्रग्ज पुरवणारे काहीवेळा तुरुंगाचेच रक्षक निघतात, तर काहीवेळा ड्रोन आणि गांजाचे गोळे तयार करून ते तुरुंगात फेकून ड्रग्ज पोहचवले जातात. कितीही दक्षता घेतली, तरीही कोलवाळ तुरुंगात ड्रग्ज पाठवले जातात. दरवर्षी कोलवाळ तुरुंगात ड्रग्ज, अन्य तंबाखूजन्य पदार्थ, मोबाईल फोन सापडतात. कधीही तुरुंगाची अचानक झडती घेतली तरी या वस्तू सापडू शकतात, एवढा इथे व्यवहार चालतो. मोबाईल फोन तर हमखास आढळतात. याच तुरुंगात बाहेरून गांजा पोहचवणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तुरुंगाबाहेर राहून ही टोळी कोलवाळच्या मध्यवर्ती कारागृहात ड्रग्ज पुरवठा करायची. हे प्रकार सुरूच होते. पण हल्लीच हा प्रकार तुरुंग प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची कल्पना दिली. एक किलो गांजाचे चेंडूसारखे गोळे तयार करून ते प्लास्टिकमध्ये व्यवस्थित गुंडाळून तुरुंगाच्या भिंतीवरून आत फेकले जायचे. एकाच वेळी एक किलो गांजा जप्त केला, यावरून किती ड्रग्जचा पुरवठा यापूर्वी या लोकांनी केला असेल त्याची कल्पनाच करावी. गांजा, चरस सेवन हे तुरुंगातील काही कैदी सर्रासपणे करतात. त्यांचे चोचले पुरवणारेही या ना त्या मार्गाने तुरुंगात ड्रग्ज पुरवठा करतात. एक रॅकेट पोलिसांच्या हाती लागले तरीही दुसरे तयार होते. किंबहुना पूर्वीपासूनच एकापेक्षा जास्त रॅकेट्स तुरुंगात वेगवेगळ्या वस्तू पुरवठा करण्यात गुंतलेली असू शकतात. आतापर्यंत तुरुंगाचेच सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी गेल्या सात वर्षांत पाच वेळा सापडले. २०१८ मध्ये एक जेलगार्ड बुटात लपवून ड्रग्ज नेताना सापडला होता. 

२०१९ मध्ये तीन जेल कर्मचारी निलंबित झाले होते, ज्यात एका अधिकाऱ्याचाही समावेश होता. त्यावेळी तुरुंगात ६७ मोबाईल, गांजा, अन्य तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले होते. २०२२ मध्ये मनुष्यबळ विकास महांमडळाच्या सुरक्षा रक्षकाने तुरुंगात ड्रग्ज नेण्याचा प्रयत्न केला होता. या वर्षीच्या सुरुवातीला एका अधिकाऱ्यासह, एक एएसआय आणि दोन कॉन्स्टेबल निलंबित झाले होते. ड्रोनचा वापर करून तुरुंगात ड्रग्ज पुरवठा होत असल्याचे त्यावेळी आढळून आले होते. या तुरुंगात सीसीटीव्हीचे जाळे आहे. आयआरबी, तुरुंग सुरक्षा रक्षक, होमगार्ड, अन्य सुरक्षा रक्षक असे प्रचंड सुरक्षा जाळे असतानाही ड्रग्ज तुरुंगात पोहचतात. फुटबॉलमध्ये ड्रग्ज भरून ते तुरुंगात फेकल्याचेही प्रकार समोर आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून तुरुंगात ड्रग्ज पोहचवले जातात. कधी गांजा, चरसचे गोलाकार बॉल तयार करून त्याला प्लास्टिकचे आवरण देऊन ते तुरुंगात फेकले जातात. एक नव्हे तर कित्येक नव्या युक्त्या काढून ड्रग्जचा पुरवठा तुरुंगात सातत्याने होत असतो. हा ड्रग्जचा पुरवठा रोखण्यासाठी कितीही उपाय केले तरी ते फेल होतात. 

गोव्यातील सुसज्ज आणि सुरक्षित तुरुंग म्हणून कोलवाळ तुरुंगाकडे पाहिले जाते. कैद्यांच्या समुपदेशनासह शिक्षण आणि रोजगाराच्या संधीही तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. असे असतानाही ड्रग्ज, मोबाईल, इतर तंबाखूजन्य पदार्थ कैद्यांपर्यंत पोहचतात. यापूर्वी तर या तुरुंगात एका सराईत गुन्हेगाराकडून दुसऱ्या सराईत गुन्हेगाराची हत्या झाली होती. तुरुंगात राहून बाहेर टोळ्या चालवणाऱ्यांचाही तुरुंगातील कैद्यांमध्ये समावेश होतो. अनेकदा कैद्यांच्या टोळ्यांमध्येच एकमेकाला मारहाण करण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे कोलवाळ मध्यवर्ती कारागृह हे गुन्हेगारी कारवायांचे केंद्रच झाले आहे. असे असतानाही तुरुंग प्रशासनातील चांगल्या कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे तिथे होणारे गैरप्रकार समोर येतात. इथली ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी ड्रोन डिटेक्शनसह मोबाईल जॅमर सक्रिय करणे, सुरक्षा यंत्रणेत वाढ करणे, तुरुंगाच्या भिंतीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा गोष्टींची अंमलबजावणी होण्याची गरज आहे. तुरुंगातील सगळे गैरप्रकार रोखणे एकाचवेळी शक्य नसले, तरी ते रोखण्यासाठी उपाय आखणे अत्यंत आवश्यक आहे.