आंतरराष्ट्रीय पाठिंब्यासाठी युनूस यांच्या प्रयत्नांना धक्का

Story: विश्वरंग |
28th June, 12:21 am
आंतरराष्ट्रीय पाठिंब्यासाठी युनूस यांच्या प्रयत्नांना धक्का

नोबेल पारितोषिक विजेते आणि सध्या बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांना त्यांच्या लंडन दौऱ्यात मोठा अपमान सहन करावा लागला. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी मोहम्मद युनूस यांच्याशी भेट घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. हे दुसऱ्यांदा घडले आहे की कोणत्या मोठ्या आंतरराष्ट्रीय नेत्याने युनूस यांच्याशी भेट घेण्यास टाळाटाळ केली आहे. यापूर्वी मे महिन्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनीसुद्धा अशाचप्रकारे भेटीचा प्रस्ताव फेटाळला होता.

मोहम्मद युनूस हे सध्या बांगलादेशात सत्तेवर असलेल्या अंतरिम सरकारचे प्रमुख आहेत. त्यांनी आरोप केला आहे की शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारच्या कार्यकाळात अब्जावधी डॉलर परदेशात बेकायदेशीररीत्या पाठवले गेले. हे पैसे परत मिळवण्यासाठी आणि संबंधित लोकांवर कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशाने युनूस यांनी लंडन दौरा केला. त्यांनी ब्रिटनकडे मदतीची मागणी केली आहे की, युनायटेड किंगडममध्ये राहत असलेल्या बांगलादेशी 'फरार' अधिकाऱ्यांविरुद्ध आणि त्यांच्या संपत्तीच्या शोधासाठी ब्रिटिश सरकारने नैतिक व कायदेशीर पातळीवर मदत करावी.

युनूस यांनी पंतप्रधान कीर स्टारमर यांच्याकडे अधिकृतपणे भेटीची वेळ मागितली होती. मात्र, ब्रिटिश सरकारच्या प्रवक्त्यांनी याची पुष्टी केली की सध्या पंतप्रधानांचा युनूस यांच्याशी भेटण्याचा कोणताही कार्यक्रम नाही. तसेच, बांगलादेशी निधी ट्रॅक करण्यासाठी किंवा परत मिळवण्यासाठी ब्रिटनकडून कोणतीही मदत केली जाईल का, या प्रश्नावरही सरकारने प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. युनूस यांनी दावा केला आहे की ब्रिटन सरकार आधीच काही प्रमाणात 'मनी ट्रेसिंग' प्रक्रियेमध्ये मदत करत आहे, मात्र, त्यांनी ही मदत आणखी दृढ आणि स्पष्ट स्वरूपात देण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. 

मे महिन्यात युनूस यांनी फ्रान्समध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांच्याशी द्विपक्षीय भेटीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, फ्रान्स सरकारने ही विनंती नाकारली होती आणि मॅक्रो-युनूस बैठक रद्द करण्यात आली होती. दरम्यान, या दोन प्रमुख युरोपीय देशांकडून मिळालेल्या या नकारामुळे मोहम्मद युनूस यांच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. 


सुदेश दळवी, गोवन वार्ता