लीड्स कसोटीत भारताचा ५ गडी राखून पराभव : पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडची १-० ची आघाडी
लीड्स : बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट संघाने टीम इंडियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी इंग्लंडने भारतावर ५ विकेट्सनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने इंग्लंडला विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान दिले होते, जे इंग्लंडने ८२ षटकांमध्ये ५ विकेट्स गमावून ३७३ धावा करत यशस्वीरित्या पार केले. बेन डकेट हा इंग्लंडच्या या विजयाचा शिल्पकार ठरला, त्याने शतकी खेळी करत संघाला विजयाकडे नेले, तर इतर फलंदाजांनी त्याला चांगली साथ दिली. मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळला जाईल.
भारताची खराब गोलंदाजी
पहिल्या डावात ६ धावांची आघाडी घेऊनही भारतीय संघ हा सामना जिंकू शकला नाही. दुसऱ्या डावात गोलंदाजांची खराब कामगिरी हे भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले. इंग्लंडकडून जो रूट ५३ धावांवर आणि जेमी स्मिथ ४४ धावांवर नाबाद राहिले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर रवींद्र जडेजाला एक बळी मिळाला. भारतीय संघाने या सामन्यात एकूण ९ झेल सोडले, पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ झेल सोडल्याने हातातून विजय निसटला.
इंग्लंडच्या सलामीवीरांची जबरदस्त भागीदारी
सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव ३६४ धावांवर संपुष्टात आला, ज्यामुळे इंग्लंडला ३७१ धावांचे आव्हान मिळाले. पाचव्या दिवसाची सुरुवात इंग्लंडने कोणत्याही विकेटशिवाय २१ धावांनी केली होती. शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५० धावांची आवश्यकता होती, तर भारताला १० बळी मिळवायचे होते. इंग्लंडकडून जॅक क्रॉली (६५ धावा) आणि बेन डकेट (१४९ धावा) यांनी शानदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची जबरदस्त भागीदारी रचली आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. या दोन्ही फलंदाजांनी पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारताला एकही यश मिळू दिले नाही.
मध्यंतरी भारताचे ४ बळी, रूट-स्मिथने खेचून आणला विजय
दुसऱ्या सत्रात भारताने चार महत्त्वाचे बळी मिळवले, परंतु अखेरीस जो रूट आणि जेमी स्मिथ यांनी जबाबदारीने फलंदाजी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून डकेटने १४९ धावा, क्रॉलीने ६५ धावा, कर्णधार बेन स्टोक्सने ३३ धावा, ऑली पोपने ८ धावा केल्या, तर हॅरी ब्रूक खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या डावात ५ विकेट्स घेणारा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुसऱ्या डावात एकही विकेट घेता आली नाही, हे भारतासाठी चिंतेचे कारण ठरले.
डकेट-क्रॉलीने मोडला ७२ वर्षांपूर्वीचा विक्रम
इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रॉली यांनी मंगळवारी भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. लीड्स येथे पाचव्या आणि शेवटच्या दिवशी ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ऐतिहासिक १८८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर दोघांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत अॅलन रे आणि जेफ्री स्टॉलमेयर यांचा ७२ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. वेस्ट इंडीजच्या अॅलन आणि जेफ्री यांनी १९५३ मध्ये भारताविरुद्ध चौथ्या डावात १४२ धावांची भागीदारी केली होती. तो सामना अनिर्णित राहिला होता.
बेन डकेटचे ऐतिहासिक शतक
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटने लीड्स कसोटी सामन्यात इतिहास रचला. यापूर्वी इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला जे जमले नव्हते, ते डकेटने करून दाखवले. आजपर्यंत लीड्स येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सलामीला येऊन शतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आर्थर मॉरिस एकमेव फलंदाज होता. मॉरिसने १९४८ मध्ये इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटीच्या चौथ्या डावात सलामीला येत १८२ धावांची शानदार खेळी केली होती. त्यानंतर आजच्या सामन्यापर्यंत कोणताही फलंदाज हा स्कोअर तर सोडाच, पण शतकापर्यंतही पोहोचू शकला नव्हता. मात्र, आता डकेटने हा दुष्काळ संपवला आहे. डकेटने पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शानदार शतक ठोकून हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
डकेटचे भारताविरुद्ध दुसरे कसोटी शतक
लीड्स कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात बेन डकेट १७० चेंडूत २१ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४९ धावा काढून बाद झाला. डकेटने आपले सहावे कसोटी शतक पूर्ण केले. भारताविरुद्ध त्याने नोंदवलेले हे दुसरे कसोटी शतक आहे. याशिवाय, त्याने पाकिस्तानविरुद्धही दोन कसोटी शतके झळकावली आहेत. तसेच, आयर्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्धही त्याने कसोटी शतके नोंदवली आहेत.
संक्षिप्त धावफलक
भारत : प. डाव ४७१ आणि दु. डाव ३६४
इंग्लंड : प. डाव ४६५ आणि दु. डाव ५ बाद ३७३
सामनावीर : बेन डकेट