एजबॅस्टन; टीम इंडियासाठी ‘अनलकी’ मैदान !

इंग्लंड वि. भारत आजपासून दुसरा कसोटी सामना : गिलच्या सेनेसमोर मोठे आव्हान

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
01st July, 11:37 pm
एजबॅस्टन; टीम इंडियासाठी ‘अनलकी’ मैदान !

एजबॅस्टन : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा आता दुसरा सामना मंगळवार (२ जुलै) पासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला कसोटी सामना जिंकत १-१ अशी बरोबरी करण्याची संधी आहे. पण, हा सामना जिंकणे शुभमन गिल आणि भारतीय संघासाठी कठीण असणार आहे. कारण एजबॅस्टन स्टेडियमवर भारताने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही.

भारताने लीड्सचा पहिला सामना गमावला होता. या सामन्यात भारतातर्फे दोन्ही डावांत एकूण पाच शतके झाली. तर जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. पण, गोलंदाजीमध्ये बुमराहला इतर गोलंदाजांची साथ लाभली नाही. याशिवाय अनेक खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करताना खराब कामगिरी केली. आता भारताला सामना जिंकून मालिकेमध्ये बरोबरी करण्याची संधी आहे. पण, इतिहास आणि आकडेवारी पाहता, भारतासाठी सामना जिंकणे कठीण होणार असल्याचे बाेलले जात आहे.
२००१ नंतर एजबॅस्टन स्टेडियमवर भारताने २०११, २०१८ आणि २०२२ मध्ये कसोटी सामने खेळले आहेत. हे तिन्ही सामने भारताने गमावले आहेत. २०११ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला २४२ धावांनी पराभव झाला होता. २०१८ मध्ये ३१ धावांनी भारतीय संघ पराभूत झाला होता. तर २०२२ मध्ये ७ विकेट्सने भारताचा पराजय झाला होता.

या मैदानावर टीम इंडियाची कामगिरी
१९६९ मध्ये भारताने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला होता, अगदी तेव्हापासून भारतीय संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. मागील ५८ वर्षांपासून एजबॅस्टनच्या मैदानावर नेहमीच भारताचा पराभव होत आला आहे. भारताने ५८ वर्षांमध्ये या स्टेडियमवर एकूण ८ सामने खेळले आहेत. यातील ७ सामने भारताने गमावले, तर एक सामना अनिर्णित राहिला. ड्रॉ सामना भारताने १९८६ मध्ये खेळला होता.

अशी असेल एजबॅस्टनची खेळपट्टी
एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवरील कसोटी क्रिकेटच्या पाच दिवसांमध्ये बॅट आणि बॉलमध्ये रोमांचक स्पर्धा होण्याची अपेक्षा आहे. इंग्लंडमध्ये अनेकदा दिसून येते तसे, सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टीवर खूप वेग आणि उसळी मिळू शकते. वरच्या फळीतील फलंदाजांना वेगवान गोलंदाजांनी वापरलेल्या शिवण हालचाली हाताळणे आव्हानात्मक वाटू शकते. ड्यूक्स बॉल फिरण्याची शक्यता असते, ज्यामुळे सुरुवातीच्या विकेट पडण्याची शक्यता वाढते, विशेषतः जर मैदान ढगाळ असेल तर.

एजबॅस्टनवर सर्वाधिक धावा
करणारे भारतीय फलंदाज (कसोटी)

विराट कोहली (२०१८-२०२२) - २ सामन्यांत २३१ धावा
सुनील गावसकर (१९७४-१९८६) - ३ सामन्यांत २१६ धावा
ऋषभ पंत (२०२२-२०२२) - १ सामन्यात २०३ धावा
सचिन तेंडुलकर (१९९६-२०११) - २ सामन्यांत १८७ धावा
गुंडप्पा विश्वनाथ (१९७४-१९७९) - २ सामन्यांत १८२ धावा

एजबॅस्टनची सरासरी धावसंख्या
पहिला डाव - सुमारे ३१०
दुसरा डाव - सुमारे २८०
तिसरा डाव - २३०-२५०
चौथा डाव - १७०-२००

सामन्यातील तीन दिवस पावसाचा अंदाज
इंग्लंडमध्ये क्रिकेट सामन्यांदरम्यान पावसाचा व्यत्यय नवीन नाही. अॅक्यूवेदरने दिलेल्या अंदाजानुसार, एजबस्टन येथे सुरू होणाऱ्या या पाच दिवसीय सामन्यांपैकी तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी (२ जुलै) ८४ टक्के पावसाची शक्यता आहे. तर, चौथ्या दिवशी (५जुलै) आणि ‍पाचव्या दिवशी (६ जुलै) ही ६०-६० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाऊस नसला तरी, ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आहे.

ऋषभ पंतला इतिहास रचण्याची संधी!
लीडस कसोटीत भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने दोन्ही डावांत शतकी खेळी करत शानदार प्रदर्शन केले. आता एजबॅस्टन येथील दुसऱ्या कसोटीत पंतला एक नवा इतिहास रचण्याची संधी आहे. पंतने या सामन्यात शतक झळकावले, तर तो इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकेल. पंतने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी शतके झळकावली आहेत, तर विराटच्या नावावरही ५ शतके आहेत. माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने इंग्लंडविरुद्ध ६ शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. पंतला अझरुद्दीनच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.

जयस्वालला गावसकरचा
जुुना विक्रम मोडण्याची संधी


इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आपले नाव इतिहासाच्या पानांवर नोंदवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला महान फलंदाज सुनील गावसकर यांचा तब्बल ४९ वर्षांचा जुना विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. या विक्रमासाठी जयस्वालला फक्त ९७ धावा करण्याची गरज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २० कसोटी सामन्यांमध्ये १९०३ धावा केल्या आहेत. जर मुंबईचा हा डावखुरा फलंदाज दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ९७ धावा करण्यात यशस्वी ठरला, तर तो गावसकर यांचा हा जुना विक्रम मोडेल.

कुलदीप यादव-नितीश रेड्डीला संधी?
एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मिळणाऱ्या मदतीमुळे आणि टर्नच्या अनुकूल परिस्थितीमुळे क्रिकेट तज्ञांनी कुलदीप यादवला भारतीय संघात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. कुलदीप आपल्या फिरकीने इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करू शकतो असे मत व्यक्त केले जात आहे. पहिल्या कसोटीत शार्दुल ठाकूर गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये प्रभावी कामगिरी करू शकला नाही. अशा परिस्थितीत, भारताकडे नितीश कुमार रेड्डीच्या रूपात एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. नितीश केवळ चांगली फलंदाजीच नव्हे, तर प्रभावी गोलंदाजी देखील करू शकतो. त्यामुळे, शार्दुलच्या जागी नितीशला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जोफ्रा आर्चरची दुसऱ्या कसोटीतून माघार
इंग्लंडने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या अंतिम ११ खेळाडूंची घोषणा केली आहे, पण यात स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला पुन्हा एकदा स्थान मिळालेले नाही. आर्चरला संघात स्थान न देण्यामागे दुखापत हे कारण नसून, कौटुंबिक आपत्कालीन परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. तो १ जुलै रोजी एजबॅस्टन येथील सराव सत्रात इंग्लंड संघात सामील होणार होता, मात्र कौटुंबिक कारणामुळे आता ते शक्य होणार नाही. त्यामुळे, त्याच्या कसोटी पुनरागमनाला पुन्हा एकदा विलंब झाला आहे.