पणजी : पश्चिम बंगालमध्ये नोंद झालेल्या मानवी तस्करीप्रकरणी फरार असलेला संशयित पिंकू राॅय (३४, आसाम) याला जुने गोवा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांच्या हस्तांतरण रिमांडवर पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पश्चिम बंगालमधील मानवी तस्करी विरोधी पथकाने २०२४ मध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, पीडित महिलेने संशयित पिंकू राॅय याच्याशी बंगळुरु - कर्नाटकात २०२३ मध्ये कंत्राटी लग्न केले होते. दि. १९ डिसेंबर २०२३ रोजी त्या दोघांनी स्थानिकांच्या साक्षीने पश्चिम बंगालमध्ये लग्न केले. त्यानंतर ते दोघे परत केरळ आणि बंगळुरुला राहू लागली. तिथे ते दोघे दुसरा संशयित अरुण प्रकाश शेट्टी याच्या रेस्टॉरन्टमध्ये काम करू लागले. ६ आॅगस्ट २०२४ रोजी रेस्टॉरन्ट मालक अरुण प्रकाश शेट्टी आणि तिचा पती पिंकू राॅय तिला आणि तिच्या मुलाची मानवी तस्करी करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी नेले. याच दरम्यान तिने आपली आणि मुलाची संशयितांच्या हातातून सुटका केली. त्यानंतर तिने पश्चिम बंगाल गाठले. तिथे पोहचल्यानंतर तिने याबाबत तक्रार दाखल केली.
चौकशी दरम्यान संशियत पिंकू राॅय गोव्यात असल्याचे पश्चिम बंगाल येथील पोलिसांना समजले. महिला पोलीस उपनिरीक्षक शांती लामा यांनी जुने गोवा पोलिसांशी संपर्क साधला. याची दखल घेऊन जुने गोवा पोलिसांनी संशयित पिंकू राॅय याचा शोध घेत त्याला अटक केली. त्यानंतर संशयिताला न्यायालयाकडून सात दिवसांच्या हस्तांतरण रिमांडावर पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.