पार्किंगच्या वादातून मारामारी, फरार संशयितांचा शोध सुरू
फोंडा : उसगाव येथील नेस्ले कंपनीजवळ एका ३७ वर्षीय युवकावर काही जणांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संदेश मोहनदास गावकर याला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार रात्री १०.३०च्या सुमारास नेस्ले फॅक्टरीसमोर राहणारा संदेश गावकर कंपनीजवळ काही कामानिमित्त उभा होता. त्यावेळी तिस्क उसगाव येथील सचिन कुर्टीकर हा युवक तेथे आला. पार्किंगच्या जागेवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर बाचाबाचित झाले. यानंतर सचिन कुर्टीकर याने आपला मित्र अमोघ नाईक याला बोलावून घेतले. अमोघ नाईक आपल्यासोबत चार-पाच मित्रांना घेऊन आला आणि त्यांनी रात्रीच संदेश गावकर याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी संदेशच्या डोक्यावर लाकडी सळीने वार केले. त्याला अर्धमेल्या अवस्थेत तिथेच सोडून संशयितांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
गंभीर जखमी झालेल्या संदेश गावकर याला सुरुवातीला सब-जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. मारहाण करणाऱ्या काही युवकांवर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.