पश्चिम बंगालमधील निर्माता श्याम सुंदर डेचे अपहरण

टीव्ही कलाकार कुणाल वर्मा, पूजा बॅनर्जी, पियूष कोठारीवर गुन्हा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th June, 12:47 am
पश्चिम बंगालमधील निर्माता श्याम सुंदर डेचे अपहरण

म्हापसा : पश्चिम बंगालमधील टिव्ही मालिकांचे निर्माते श्याम सुंदर डे यांना धमकावून त्यांचे अपहरण व २३ लाखांची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली कळंगुट पोलिसांनी टेलिव्हिजन कलाकार कुणाल वर्मा, पूजा बॅनर्जी उर्फ पूजा बोस, पियूष कोठारी व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

निर्माते श्याम सुंदर डे यांच्या पत्नी मलाबिका डे (रा. कोलकाता) यांनी याप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार, बिद्यानगर पश्चिम बंगाल मधील पोलीस उपआयुक्तांनी भा. न्या.सं. च्या १२६(२), १३७(२), १४०(२), ३०८(५), ११५(२), ३५१(३), ३(५), ६१(२) कलमान्वये शून्य एफआयआर दाखल केला होता. हे प्रकरण कळंगुट पोलिसांकडे वर्ग केले होते. त्यानुसार कळंगुट पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी सुरू केली आहे.

हा प्रकार ३१ मे ते ४ जून २०२५ दरम्यान घडला होता. तर, पश्चिम बंगाल पोलिसांकडून गुन्हा वर्ग होताच गुरुवारी २६ रोजी कळंगुट पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

वरील संशयितांनी संगनमताने गुन्हेगारी कट रचला आणि पीडित श्याम सुंदर डे हे आपल्या सहकाऱ्यांसह भाड्याच्या कारने प्रवास करताना त्यांना अडवले. त्यांचे त्यांच्याच कारमधून जबरदस्तीने अपहरण केले. तसेच हणजूणमधील एका हॉटेलमध्ये आणि साळगावमधील एका व्हिलामध्ये कोंडून ठेवून त्यांना मारहाण केली. शिवाय ड्रग्ज तस्करीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत श्याम सुंदर डे यांच्याकडून २३ लाख रुपये रक्कम खंडणीच्या स्वरुपात उकळल्याचा दावा फिर्यादींनी केला आहे.

पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मांद्रेकर हे करीत आहेत.

श्याम सुंदर डे यांना पाचारण; संशयितांना नोटिसा

श्याम सुंदर डे यांना कोंडून ठेवण्यात आलेल्या हणजूण येथील हॉटेल व साळगाव येथील व्हिलाची ओळख तसेच अपहरणाची जागा पाहण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. तसेच संशयितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ते गोव्यात दाखल झाल्यावर पुढील कारवाई पोलिसांकडून होणार आहे. 

हेही वाचा