जोयडा : उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील हळवल्ली गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. डोंगरी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या या गावात, एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा शेणाच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला.
साध्वी श्रीकांत हेब्बार (वय २) असे मृत बालिकेचे नाव आहे. तिचे वडील श्रीकांत हेब्बार कामानिमित्त गोठ्यात गेले होते. त्यांच्यासोबतच त्यांनी आपल्या मुलीला देखील नेले होते. गोठ्यातील कामकाजात व्यग्र असताना साध्वी आजूबाजूला खेळत होती. खेळता खेळता ती जवळच असलेल्या शेणाच्या खड्ड्याकडे गेली आणि त्यात पडली.
वेळीच लक्ष न गेल्यामुळे तिला वाचवता आले नाही. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून, यापुढे अशी दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.