अमर नाईक खूनप्रकरणातील संशयित रईझ शेखला सशर्त जामीन

चिकोळणा येथील निर्जनस्थळी झाला होता खून

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
27th June, 12:05 am
अमर नाईक खूनप्रकरणातील संशयित रईझ शेखला सशर्त जामीन

पणजी : नवेवाडे येथे अमर नाईक याच्या गोळीबार करून हत्या केल्या प्रकरणातील संशयित रईझ शेख याला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस यांनी दिलेल्या आदेशानुसार, शेखला एक लाख रुपयांची हमी व अन्य अटींच्या अधीन राहून जामिनावर सोडण्यात येणार आहे.

नवेवाडे वास्को येथील अमर नाईक (३६) याची १५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी चिकोळणा येथील एका निर्जनस्थळी पिस्तुलाची गोळी डोक्यामध्ये झाडून हत्या केली होती. तर, अमर नाईक याचा मित्र प्रितेश याच्यावर हल्लेखोरांनी झाडलेली गोळी चुकल्याने तो वाचला. याप्रकरणी प्रितेश नाईक याने वास्को पोलिसात तक्रार दाखल केली होती. वास्को पोलिसांनी मुंबई येथील शैलेश गुप्ता व शिवम सिंग या दोघा सुपारी किलरना कासावली येथील रेल्वे स्थानकावरून अटक केली होती. अमर नाईक यांच्या हत्याप्रकरणी दोघा हल्लेखोरांनी वापरलेली मॅगझिन व काडतूससह देशी बनावटीचे दोन पिस्तुल, मॅगझिन, काडतूस इत्यादी पोलिसांनी हस्तगत केले. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची अधिक चौकशी केली असता, त्यांना संशयित रवीशंकर यादव याने सुपारी दिल्याचे तसेच त्यानेच त्या दोघांना अमर नाईक याचा खून करण्यासाठी गोव्यात आणल्याची माहिती दिली. माहिती मिळाल्यावर पोलिसांनी रवीशंकर यादव याला १६ जुलै २०२१ रोजी अटक केली. पोलिसांनी या तिघांसह रईझ शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास पूर्ण करून मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

दरम्यान, रईझ शेख हा दुबईत होता. २७ आॅक्टोबर २०२४ रोजी त्याला मोपा विमानतळावर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याने मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने २१ फेब्रुवारी २०२५ रोजी फेटाळून लावला. त्यानंतर त्याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने संशयित रईझ शेख याला एक लाख रुपये, महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान वास्को पोलीस स्थानकावर हजेरी लावणे, परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाण्यास बंदी व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

दुबईहून परतल्यानंतर रईझला झाली होती अटक

पोलिसंनी तिघांसह रईझ शेखवर खून प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. रईझ हा दुबईत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. दुबईत असल्याने तो सापडू शकला नव्हता. मात्र, २०२४ मध्ये तो मोपा विमानतळावर येत असल्याची माहिती मिळताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. 

हेही वाचा