एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने फसवणूक; ज्येष्ठ नागरिक, युवकाचे ८७ हजार लांबवले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th June, 12:19 am
एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने फसवणूक; ज्येष्ठ नागरिक, युवकाचे ८७ हजार लांबवले

वास्को : एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली येथील एका ज्येष्ठ नागरिकाची व एका युवकाची एका अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याच्या तक्रारी वास्को पोलीस स्थानकात करण्यात आल्या आहेत. सदर व्यक्तीने मेर्सीज वाडे येथील भास्कर (६४) यांच्या खात्यातून ५७ हजार रुपये तर मेस्तवाडा येथील दुर्गाप्पा (३०) याच्या खात्यातून ३० हजार रुपये काढल्याचे तक्रारींमध्ये म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेलेया माहितीनुसार, मेर्सीज वाडे येथे राहणारे भास्कर हे २६ जून रोजी वास्कोतील कॅनरा बँकेतील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएममध्ये आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने भास्कर यांना एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाणा केला. त्यानंतर त्या व्यक्तीने भास्कर यांच्याकडे असलेल्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. सदर अदलाबदल भास्कर यांच्या नजरेत आली नाही. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने भास्कर यांच्या एटीएम कार्डचा वापर करताना, एटीएममध्ये दोन व्यवहार करून ५७ हजार रुपये काढले. याप्रकरणी वास्को पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली.

अन्य एका घटनेत दुर्गाप्पा हा युवक २६ जूनला बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. यावेळी त्या एटीएममध्ये आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याला पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला. असे करताना त्याने दुर्गाप्पा याच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्या अज्ञात व्यक्तीने नंतर दुर्गाप्पा याच्या एमटीएम कार्डचा तीन वेळा वापर करून प्रत्येकी दहा हजार असे तीस हजार रुपये एटीएममधून काढले. दोन्ही घटनांबाबत उपनिरीक्षक प्लेटो कार्व्हालो तपास करीत आहेत.