कंटेनरच्या धडकेने दुचाकीवरील विवाहितेचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर

वाळपई-होंडा मार्गावरील रेडीघाट येथे अपघात : मद्यधुंद चालकाला स्थानिकांनी पकडले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th June, 12:34 am
कंटेनरच्या धडकेने दुचाकीवरील विवाहितेचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर

वाळपई : होंडा- वाळपई मार्गावर रेडीघाट येथे शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातामध्ये साखळी येथील वनिता मोर्लेकर उर्फ पोकळे या विवाहितेचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीवरील चालकही गंभीर जखमी झाला. कंटेनरने दुचाकीला धडक दिल्यामुळे सदर अपघात घडला.

शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वनिता मोर्लेकर उर्फ पोकळे ही जी. ए. ०४ जे ७९२६ या दुचाकीवरून वाळपई भागातून होंडाच्या दिशेने जात होती. रेडीघाट या ठिकाणी समोरून येणाऱ्या कंटेनरने (एम.एच.१२ ए

एक्स २५६४) या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील वनिता मोर्लेकर व चालक गंभीर जखमी झाला. वनिता मोर्लेकर हिच्या डोक्याला जबर जखम झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांकडून प्राप्त झाली.

कामावरून सुटल्यानंतर जात होती घरी

वनिता ही वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती. आठ वाजता तिची ड्युटी संपल्यानंतर ती साखळी येथील आपल्या घरी जात होती. यावेळी प्रवासी बसेस नसल्यामुळे तिने एका दुचाकीवरून लिफ्ट घेतली होती. रेडीघाट या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात मुलगा व पती असा परिवार आहे.

वनिता ही मूळची कोपार्डे येथील आहे. साखळी येथे तिचे लग्न झाले होते. कामावरुन सुटल्यानंतर ती साखळी येथे घरी जात होती.

धडक दिलेला कंटेनरचा चालक दारूच्या नशेत

प्राप्त माहितीनुसार, कंटेनरचा चालक दारूच्या नशेत होता. दुचाकीला धडक दिल्यानंतर त्याने घटनास्थळावरुन पलायन केले. स्थानिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला वाळपई येथे अडविले. त्याला पकडून वाळपई पोलिसांच्या स्वाधीन केले.

होंडा भागातून दारूच्या नशेत येत होता टँकर

होंडा भागातून सदर कंटेनर वाळपईच्या दिशेने येत होता. कंटेनरच्या चालकाने दारू पिल्याचे समजते. अनेक गाड्यांना हूल देण्याचा प्रयत्न त्याच्याकडून झाला होता. दुर्दैवाने रेडीघाट येथे त्याने दुचाकीला धडक दिल्यामुळे वनिता मोर्लेकर या विवाहितेचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून कंटेनर चालकाला अटक

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर व त्याच्या चालकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर अपघात प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पंचनामा करून वनिता मोर्लेकर हिचा मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. 

हेही वाचा