कैदी मंथन च्यारीला अटक : ४ दिवस पोलीस कोठडी
म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात गोळा करून फेकलेल्या गांजा तस्करीतील कैदी संशयित मंथन राजू च्यारी (२५, रा. घाटेश्वरनगर, खोर्ली) याला कोलवाळ पोलिसांनी अटक केली. कैदी मंथन हाच अटक केलेल्या टोळीच्यामार्फत कारागृहात ड्रग्जची तस्करी करीत होता, हे चौकशीतून उघडकीस आले आहे. गणेशपुरी- म्हापसा येथे झालेल्या अहमद देवडी खून प्रकरणात अटक झाल्यापासून कैदी मंथन हा गेले वर्षभर कारागृहात होता.
पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या गौतम तलवार (२४, अन्साभाट-म्हापसा), सॅम्युअल पुजारी (२४, अन्साभाट-म्हापसा) व जाफर मुल्ला (२४, गंगानगर खोर्ली, म्हापसा) या तिघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी या ड्रग्ज तस्करीमध्ये कैदी मंथन च्यारी याचा समावेश असल्याचे उघड केले होते.
त्यानुसार, शुक्रवारी पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने कैदी मंथन च्यारीला कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. सायंकाळी म्हापसा न्यायालयाने संशयिताला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
दरम्यान, ही घटना दि. १४ जून रोजी उघडकीस आली होती. कोलवाळ कारागृहातील वॉच-टॉवर क्रमांक ३ वर ड्युटी बजावण्यासाठी चढताना आयआरबी पोलिसांच्या नजरेस हे गोळे पडले आणि या ड्रग्ज तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता.
दि. १५ रोजी कारागृह अधिकाऱ्यांच्या माहितीनंतर कोलवाळ पोलिसांनी गुन्हा नोंदवून सात गोळ्यांमध्ये असलेला १ लाख ४० हजार रूपये किमतीचा १.३९७ किलो गांजा जप्त केला होता. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संशयितांचा शोध घेत बुधवारी दि. २५ जून रोजी पहाटे संशयित गौतम, सॅम्युअल व जाफर या तिघांसह एका १६ वर्षीय अल्पवयीन युवकाला पकडले. नंतर तिन्ही संशयितांना अटक केली तर अल्पवयीनाला बाल न्याय मंडळाच्या स्वाधीन केले होते.
मंथन च्यारी याने संशयितांशी फोनवरून संपर्क साधून कारागृहात गांजाचा पुरवठा करण्यास सांगितले होते. एक महिन्यापूर्वी संशयितांनी अशाचप्रकारे गोळा फेक करून गांजा कारागृहात पाठवला होता. घटनेच्या दिवशी झाडाला दोरी बांधून संशयित कारागृहाच्या संरक्षक भिंतीवर चढले आणि तिथून गांजा गुंडाळलेल्या प्लास्टिकचे गोळे त्यांनी फेकले. मात्र, वाऱ्या पावसामुळे ते निश्चित ठिकाणी न पडता दोन संरक्षक भिंतींच्यामध्ये पडले गेले.
पहाटे ४ वा. सुमारास संशयितांनी हा गांजा फेकला होता. पहाटे ५.३० वा. सुमारास मंथन च्यारी हा आपल्या अंडरट्राईल विभागाच्या बाहेर आला आणि गांजाचे गोळे शोधायला लागला. त्याच्या हाती काहीच लागले नसल्याने तो माघारी परतला. नंतर सकाळी कारागृह सुरक्षा यंत्रणेला हा गांजा सापडला होता.