टारझन पार्सेकरच्या जीवाला कोलवाळ कारागृहात धोका

विशेष विभागात रवानगी : बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th June, 12:09 am
टारझन पार्सेकरच्या जीवाला कोलवाळ कारागृहात धोका

म्हापसा : रेईश मागूश येथील एका बांधकाम व्यावसायिकाला मासिक १ लाख रुपये रकमेच्या खंडणीसाठी धमकी दिल्याच्या आरोपाखाली पर्वरी पोलिसांनी अटक केलेल्या टारझन पार्सेकर टोळीतील तिन्ही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर, टारझनच्या जीवाला धोका असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची कोलवाळ कारागृहात विशेष विभागात व्यवस्था करण्यात आली आहे.

कारागृहात यापूर्वी दोनवेळा कैदी विजय कारबोटकर टोळीकडून टारझन पार्सेकरवर हल्ला झाला होता. त्यावेळी या हल्ल्याची चौकशी जिल्हा सत्र न्यायाधीशांनी करून कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. आपल्या अशिलाला कारागृहातील न्यायालयीन कोठडीत पाठवल्यास तिथे त्याच्या जीवाला धोका आहे, कारण याअगोदर दोनवेळा त्याच्यावर हल्ले झाले होते. त्यामुळे त्याची वेगळ्या विभागात व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संशयित टारझन पार्सेकर याचे वकील अॅड. रितेश रावळ यांनी केली. ही मागणी न्यायालयाने मंजूर केली व कारागृह प्रशासनाला तसा आदेश दिला. यानंतर टारझनची वेगळ्या विभागात रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, शनिवारी २८ रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपी टारझन रामचंद्र पार्सेकर (३८, रा. नागवा बार्देश), सागर उर्फ शत्रुपाल संतोष पाटील (३७, रा. नागवा बार्देश) व सनिश सतीष घाटवळ (१९, रा. मुड्डावाडी, साळगाव) या तिघांना म्हापसा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ११ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

खंडणीचा प्रकार ८ जून रोजी दुपारी १.३० वा. सुमारास पिळर्ण येथील सावळे तळी जवळ घडला होता. या प्रकरणी अविनाश शिंदे (रा. रेईश मागूश) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. संशयित आरोपींनी त्यांच्यासमोर कार आडवी घालून मासिक एक लाख रूपये खंडणीची मागणी केली. खंडणीची रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच १ लाख रुपये खंडणीची रक्कम त्यांनी फिर्यादींकडून उकळली होती.

रविवार दि. २२ रोजी पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपींना नानेरवाडा पेडणे येथील अजित सातार्डेकर यांच्या घरातून शिताफीने पकडून अटक केली होती. त्यापासून ते गेले सात दिवस पर्वरी येथील पोलीस कोठडीत होते. 

हेही वाचा