संशयित बापाची कबुली : धारगळ येथे झालेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी : काही तासांतच आरोपी गजाआड
संशयित नीलेश देसाई याला न्यायालयात उपस्थित करण्यासाठी नेताना पेडणे पोलीस. (निवृत्ती शिरोडकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे/म्हापसा : धारगळ येथे एका महाविद्यालयीन युवकावर अॅसिड हल्ला केल्याच्या आरोपाखाली अवघ्या काही तासांतच पेडणे पोलिसांनी संशयिताला गजाआड केले. हल्ल्यानंतर करासवाडा-म्हापसा येथील औद्योगिक वसाहतीत संशयित लपून बसला होता. आपल्या मुलीच्या आत्महत्येला सदर युवकच कारणीभूत आहे. त्या रागातूनच आपण अॅसिड हल्ला केला, अशी कबुली संशयिताने पोलिसांसमोर दिली आहे. अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी युवकावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पेडणे पोलिसांत जखमी युवकाचे वडील उमेश शेटये यांनी तक्रार नोंदवली आहे.
सोमवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास ऋषभ उमेश शेटये (१७) धारगळ बसस्थानकावर उभा होता. तो म्हापसा येथील सारस्वत महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. नेहमीप्रमाणे ऋषभच्या वडिलांनी त्याला कॉलेजला जाण्यासाठी बसस्थानकावर सोडले आणि ते घरी गेले. तेथेच संशयित नीलेश गजानन देसाई (४६, रा. दाबीवाडी, कळणे- दोडामार्ग) दबा धरून बसला होता. संशयिताने काळा रेनकोट आणि हातमोजे घातले होते. ऋषभ एकटाच असल्याचे पाहून संशयित नीलेश त्याच्याजवळ गेला. त्याने सोबत पिशवीतून आणलेल्या बाटलीतील अॅसिड ऋषभच्या अंगावर फेकले. भाजल्यामुळे ऋषभने जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत अंदाजे शंभर मीटर पळापळ केली. अॅसिड असलेली बाटली तिथेच टाकून संशयित नीलेशने स्कूटरवरून म्हापसाच्या दिशेने पसार झाला. कोणीतरी या घटनेची माहिती ऋषभच्या वडिलांना दिली. त्यांनी दुचाकीवरूनच घटनास्थळ गाठले. ऋषभची स्थिती पाहून ते परत घरी गेले आणि चारचाकी वाहन आणले. चारचाकी वाहनातून ऋषभला त्यांनी थेट म्हापसा जिल्हा इस्पितळात आणले. प्राथमिक उपचार केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी ऋषभला गोमेकॉत पाठवले. गोमेकॉत त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तपासासाठी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांची मदत
घटनेची माहिती मिळताच पेडणे आणि मोपा विमानतळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक सलीम शेख, निरीक्षक सचिन लोकरे, नारायण चिमुलकर यांनीही घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळी जखमी ऋषभची जळालेली बॅग, शर्ट व अॅसिडची बाटली सापडली. पोलीसांनी पंचनामा केला. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांची तपासासाठी मदत घेण्यात आली. पोलीस निरीक्षक सचिन लोकरे, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, प्रवीण सिमेपुरुषकर, प्रथमेश पार्सेकर, तुकाराम चोडणकर, साहील नाईक, हवालदार तीर्थराज म्हामल, कॉन्स्टेबल सचिन हळर्णकर, सागर खोर्जुवेकर, कृष्णा वेळीप, गुरुदास धुरी, विनायक परब, रोहन केपकर, शशांक साखळकर, प्रज्योत मयेकर यांनी मोपा आणि मांद्रे पोलिसांच्या साहाय्याने या प्रकरणाचा छडा लावला.
प्रेम प्रकरणातून हल्ल्याचा प्राथमिक अंदाज
प्रेम प्रकरणातूनच प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला. ऋषभची एका मुलीसोबत मैत्री होती. ती धारगळ जवळच आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. विषप्राशन करून तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या मुलीचे वडील करासवाडा म्हापसा येथील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीमध्ये कामाला असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांना कंपनीतून ताब्यात घेतले. हा हल्ला संशयितानेच केल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले. चौकशीत संशयिताने गुन्ह्याची कबुलीही दिली. पोलिसांनी भा.न्या.सं.चे कलम १२४(१) व १०९ व गोवा बाल कायदा कलम ८(२) अन्वये गुन्हा नोंदवून संशयिताला अटक केली.
संशयिताच्या मुलीचा मे महिन्यात अनैसर्गिक मृत्यू
संशयित आरोपी नीलेश देसाई यांच्या मुलीने ७ मे रोजी राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिला दोडामार्ग आरोग्य केंद्रातून लगेच गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले होते. २० मे रोजी तिचे उपचारादरम्यान निधन झाले. याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करून तपासकार्य सुरू केले होते.
संशयिताची ऋषभविरोधात पोलिसांत धाव
मुलीच्या निधनाच्या आठवड्याभरानंतर संशयित नीलेश देसाई यांनी तिच्या मोबाईल फोनचे लॉक काढून घेतले. मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी, तसेच तिचे आणि ऋषभचे व्हॉटस्अॅप चॅट सापडले. त्यामुळे संशयिताला मुलीच्या आत्महत्येमागील कारण समजले. त्यांनी याबाबत दोडामार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली. शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू कावीळ होऊन झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे दोडामार्ग पोलिसांनी संशयिताच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही.
मरण यातना देण्याच्या हेतूनेच हल्ला; पोलिसांचा संशय
पोलीस तक्रारीनुसार कारवाई करत नाहीत. मुलीच्या मृत्यूला कारणीभूत युवक मोकळा फिरत आहे. यामुळे संशयित नीलेशचा राग अनावर झाला. त्याने ऋषभला धडा शिकवण्याचा निर्धार केला. ऋषभ रोज धारगळ स्थानकावर कॉलेजला जाण्यासाठी थांबत असतो. तो त्यावेळी एकटाच असतो, याची शहानिशा संशयिताने केली होती. अॅसिड फेकून त्याला ठार मारण्याचा निश्चय संशयिताने केला होता. त्यासाठी त्याने कंपनीतून अॅसिड आणले होते. सोमवारी हल्ल्याची कल्पना त्याने सत्यात उतरवली. आपल्या मुलीने इस्पितळात जेवढ्या यातना सोसल्या, तेवढ्याच यातना तिच्या मृत्यूला कारणीभूत युवकाला सोसाव्या लागाव्यात, म्हणूनच संशयिताने अॅसिड हल्ल्याची कल्पना आखली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ऋषभची प्रकृती नाजूक; गोमेकॉत व्हेंटिलेटरवर उपचार
अॅसिड हल्ला झालेल्या धारगळच्या ऋषभ शेट्येवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती नाजूक असून तो सध्या व्हेंटिलेटवर आहे. त्याचे डोळे, गाल, नाक, तसेच खांदा भाजले आहेत, असे गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले. ऋषभवर डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. तो उपचारांना कसा प्रतिसाद देतो, हे पाहून उद्यापर्यंत त्याच्या आरोग्याची स्थिती स्पष्टपणे सांगता येईल. त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे, असेही डॉ. राजेश पाटील म्हणाले.
हल्ल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया
अॅसिड हल्ल्याची चौकशी होऊन हल्लेखोरावर कारवाई व्हावी. तरुणावर अॅसिड हल्ला होणे, ही गंभीर बाब आहे, असे पत्र आमदार अालेक्स रेजिनाल्ड यांनी पोलीस महासंचालक अलोक कुमार यांना लिहिले आहे.
कठोर कारवाईची आमदारांची मागणी
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेसचे युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार क्रूझ सिल्वा, आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह बऱ्याच आमदारांनी अॅसिड हल्ल्याची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली. राज्यातली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे. हा विषय अधिवेशनात उपस्थित केला जाईल, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
अॅसिड फेकण्याचे म्हापसा पोलिसांत तीन गुन्हे
जून २०१६ : तवान्सियोवाडा-गिरी येथे धारगळकर कुटुंबियावर उघड्या खिडकीतून अॅसिडफेक झाली होती. यात चिन्मया धारगळकर (१६) आणि लिलावती हळदणकर या तिची आजी जखमी झाल्या होत्या. धारगळकर व गावस कुटुंबांमधील पायवाटेच्या वादातील पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला होता. मोतीराम धारगळकर यांच्या तक्रारीमया आधारे म्हापसा पोलिसांनी नारायण गावस व सनीत देसाई यांना अटक केली होती.
डिसेंबर २०१९ : म्हापसा बाजारपेठेत कौटुंबिक वादातून विशाखा वासुदेव पेडणेकर या यशवंत गुरूदास पेडणेकर (बस्तोडा) या काकाने अॅसिड फेकले होते. या हल्ल्यात विशाखा जखमी झाली होती. याप्रकरणी संशयित यशवंत यांना अटक झाली होती.
नोव्हेंबर २०२० : आल्तो धुळेर येथे अज्ञाताने सुदेश हसोटीकर यांच्या स्कुटरवर अॅसिड फेकून ती जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी म्हापसा पोलिसांत हसोटीकर यांनी तक्रार नांदवली होती.