आमदार गोविंद गावडे निखालस खोटे बोलले!

दामू नाईक यांचा पलटवार : मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th June, 12:54 am
आमदार गोविंद गावडे निखालस खोटे बोलले!

पणजी : भाजपचे प्रदेशाध्यक्षांना 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे म्हणून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई कोण करणार, अशी विचारणा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी जाहीर सभेत केल्यानंतर शनिवारी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. गोविंद गावडे यांच्याविषयी पक्षाच्या धोरणाप्रमाणेच प्रक्रिया केली होती. त्यामुळे ते ‘निखालस खोटे’ बोलतात, असे नाईक म्हणाले.                        

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी शनिवारी पक्षाच्या कामासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दामू नाईक यांनी गावडे यांनी केलेल्या आरोपांना 'गावडे राजकारण करत आहेत' असे म्हणत त्यांचे आरोप खोडून काढले.                         

'गोविंद गावडे निखालस खोटे बोलतात. सुदीन ढवळीकर यांच्याविषयी बोलले तेव्हाही मीच त्यांना पणजी कार्यालयात बोलावून समज दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर जेव्हा गोविंद गावडे यांनी आरोप केले तेव्हा दुसऱ्या दिवशी मला दिल्लीतून पक्षनेत्यांचे फोन आले. त्यानंतर मी गावडे यांनी केलेल्या आरोपांचा व्हिडिओ पाहिला. शिवाय मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांकडे चर्चा केली. त्यानंतरच मी विधान केले. २ जून रोजी मी त्यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली. त्यानंतरच त्यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे गोविंद गावडे जे बोलतात ते साफ खोटे आहे’, असे दामू नाईक म्हणाले. 

पक्षांतर्गत कारवाईचे स्पष्टीकरण 

‘मी पक्षाच्या चौकटीत राहूनच गावडे यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रक्रिया केली. गावडे यांनी केलेल्या आरोपांनंतर मी पत्रकारांशी बोलताना गोविंद गावडे यांच्याशी चर्चा करणार, असेही सांगितले होते. त्यावेळी गावडे यांना उद्देशून 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे करणे योग्य नाही असे म्हटले होते. त्यांच्या बाबतीत पक्षाने आपल्या पद्धतीनेच आवश्यक ती प्रक्रिया केली. त्यांना मंत्रिमंडळातून हटवण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो. पण, त्यांच्यावर कारवाईसाठी पक्षांतर्गत चौकशी करण्याची प्रक्रिया पक्ष करतो, पक्षाने तेच केले आहे हे गावडे यांनी समजून घ्यावे’, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले. 

राजकीय हेतूवर प्रश्नचिन्ह
- गावडे यांनी एकदा दिल्लीत पक्ष नेत्यांना देण्यासाठी मला पत्र दिले होते, ते मी दिल्लीला पोहोचवले. दिल्लीतून त्यांना कधीही बोलावू शकतात. माझे काम हे पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे आहे, असे दामू नाईक यांनी सांगितले.
- गावडे यांनी राजकारण करावे, पण त्याला अर्थ असायला हवा. मी गोविंद गावडे यांना भेटल्याच्या तारखा, वेळा सांगू शकतो. त्यामुळे गावडे जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नाही, असेही दामू नाईक यांनी नमूद केले.


तवडकरांचा मंत्रिमंडळात लवकरच समावेश

सभापती रमेश तवडकर यांचा येत्या दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या शपथविधीची योजना होती. परंतु, ते आजारी पडल्यामुळे तो लांबणीवर पडला. शपथविधी शनिवारी होण्याची शक्यता होती, पण आता तो येत्या आठवड्यात होऊ शकतो. भाजपने तवडकर यांना मंत्रिपद देण्याचे निश्चित केले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त, लोबो दाम्पत्यापैकी एकाला आणि आमदार दिगंबर कामत यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.