सायबर पोलिसांकडून गुन्हे दाखल : एका संशयिताला अटक
पणजी : गोव्यात सायबर गुन्हेगारांनी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. 'डिजिटल अरेस्ट', क्रेडिट कार्ड आणि एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात आसगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाला २.१४ कोटी, दोनापावला येथील महिलेला ९७ लाख, तर जुने गोवा परिसरातील एका ज्येष्ठाला क्रेडिट कार्ड फसवणुकीत ३.१३ लाखांचा फटका बसला आहे. या प्रकरणी सायबर गुन्हा विभागाने गुन्हे दाखल केले असून, जुने गोवा पोलिसांनी क्रेडिट कार्ड फसवणूक प्रकरणात कोलकाता येथून एका संशयिताला अटक केली आहे.
या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी ५ जून रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित कोलकाता येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोलकाता येथे जाऊन नेताजी नगर पोलिसांच्या मदतीने सुमन घुघू नावाच्या संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला तेथील न्यायालयात हजर करून ३ दिवसांच्या हस्तांतरण रिमांडवर गोव्यात आणण्यात आले आहे. त्याला पोलीस कोठडीसाठी सोमवारी मेरशी प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आसगावात ज्येष्ठ नागरिकाला २.१४ कोटींना फसवले
गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आसगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यांना टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) आणि केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅप कॉल केला. तक्रारदाराचे नाव नरेश गोयल या मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आल्याचे सांगून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले. हे प्रकरण मिटवण्यासाठी संशयितांनी तक्रारदाराला ३० मे पासून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २ कोटी १४ लाख ४० हजार १३२ रुपये जमा करण्यास भाग पाडले. सायबर विभागाने यावर तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दोनापावलातील ज्येष्ठ महिलेची ९७ लाखांची फसवणूक
दुसऱ्या एका प्रकरणात, दोनापावला येथील एका ज्येष्ठ महिलेची ९७ लाखांची फसवणूक झाली आहे. या महिलेने २५ जून रोजी सायबर विभागात तक्रार दाखल केली. तिला २१ जूनपासून ट्राय आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तींनी वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधला. तक्रारदाराचा मोबाईल क्रमांक मानवी तस्करीच्या कारवायांशी जोडला गेल्याची भीती त्यांना दाखवण्यात आली. तसेच, त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करून हे प्रकरण मिटवण्यासाठी दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ९७ लाख जमा करण्यास भाग पाडले.
या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (३) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ डी अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, तपास सुरू आहे.
निवृत्त बँक कर्मचाऱ्याला लाखो रुपयांचा चुना
जुने गोवा परिसरात क्रेडिट कार्ड फसवणुकीचा प्रकार घडला आहे. सांताक्रुझ येथील ७१ वर्षीय निवृत्त बँक कर्मचाऱ्याला ३० मे रोजी 'बँक ऑफ बडोदा'चा अधिकारी दीपक अग्रवाल असल्याचे भासवून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करण्यात आला. आरोपीने त्यांना क्रेडिट कार्डवर मोफत शॉपिंग ऑफर असल्याचे सांगून त्यांच्या क्रेडिट कार्डचा क्रमांक, पासवर्ड, सीव्हीव्ही कोड आणि इतर गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ३.१३ लाख रुपये काढून घेतले.
एटीएममध्ये मदतीच्या बहाण्यानेही फसवणूक
'डिजिटल अरेस्ट' आणि क्रेडिट कार्ड फसवणुकीव्यतिरिक्त, डिचोली, वास्को आणि पणजी येथील पोलीस स्थानकांमध्ये एटीएममध्ये ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे प्रकारही समोर आले आहेत. राज्यात २५ आणि २६ जून रोजी हरिणातील आंतरराज्य टोळीने ९ जणांना लुबाडले. यामध्ये डिचोलीत १, म्हापसा ३, पणजी २, पर्वरी १ आणि हार्बर मुरगावमध्ये २ अशा तक्रारी पोलिसांत नोंद करण्यात आल्या आहेत.