होंडा येथील लाईनमन मृत्यूप्रकरणी चौकशी अहवाल तयार
पणजी : होंडा-पोस्टवाडा येथे २० मे रोजी ट्रान्सफॉर्मरवर काम करत असताना शॉक लागून लाईनमन चंद्रू गावकर यांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेची अभियंत्यांनी केलेली चौकशी पूर्ण झाली आहे. याबाबतचा अहवाल लवकरच सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती वीज खात्याच्या अभियंत्यांनी दिली. चुकीच्या पद्धतीने अर्थिंग रॉड बसवल्याने शॉकची तीव्रता वाढल्याचे या चौकशीतून समोर आले आहे.
२० मे रोजी होंडा-पोस्टवाडा येथे शटडाऊन असताना ट्रान्सफॉर्मरवर दुरुस्तीचे काम सुरू होते. लाईनमन चंद्रू गावकर यांचा बराच वेळ काम सुरू असताना शॉक लागून मृत्यू झाला. वीज खात्याच्या अभियंत्यांनी केलेल्या निरीक्षणानुसार, वीज जवळच्या इन्व्हर्टरमधून ट्रान्सफॉर्मरमध्ये गेली असली तरी, अर्थिंग रॉड चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे विजेच्या शॉकची तीव्रता वाढली. दरम्यान, शटडाऊन असताना काम करणारे लाईनमन आणि इतर कामगारांनी अर्थिंग रॉडकडे दुर्लक्ष केले, अशी माहिती वीज अभियंत्याने दिली.
तांत्रिक त्रुटी आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन
चंद्रू गावकर (मोर्ले-सत्तरी) हा लाईनमन शॉक लागून खांबावरच अडकून पडला. त्याच्यासोबत काम करणारा आणखी एक लाईनमन शॉक लागल्यानंतर खाली पडला आणि जखमी झाला. थ्री फेज ट्रान्सफॉर्मरवर काम करताना अर्थिंग रॉड थ्री फेजला बसवणे आवश्यक असते, परंतु तो टू फेजमध्ये लावण्यात आला होता. त्यामुळे विजेच्या धक्क्याची तीव्रता आणखी वाढली, असे अभियंत्यांनी सांगितले. ट्रान्सफॉर्मरवर काम करण्यापूर्वी, वीज पुरवठा करणारी वाहिनी शॉर्ट करून ती जमिनीत लावणे आवश्यक असते, या नियमाचेही उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मृत लाईनमनच्या कुटुंबाला नियमांनुसार विभागाकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. या घटनेमुळे वीज खात्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.