ड्रग्ज तस्करीतील सहभागप्रकरणी मुंबईतून मुख्य सूत्रधाराला अटक

पुण्यातील तरुणाच्या चौकशीतून गोव्यातील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
ड्रग्ज तस्करीतील सहभागप्रकरणी मुंबईतून मुख्य सूत्रधाराला अटक

पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) ड्रग्ज तस्करीविरोधात मोठी कारवाई करत, पुण्यातील कृष्णा सोनकेल्लू (वय २८) याच्या चौकशीतून मुंबईतील मुख्य सूत्रधार अश्रफ शेख याला अटक केली आहे.
एएनसी पथकाला गोव्यातील किनारी भागांमध्ये विशेषतः आठवड्याच्या शेवटी पार्टीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाली होती. तसेच महाराष्ट्रातून काही उच्चशिक्षित तरुण ड्रग्ज घेऊन शुक्रवारी गोव्यात येऊन हरमल परिसरात वास्तव्यास असतात, अशीही माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, शनिवारी सायंकाळी चोपडे परिसरात ड्रग्ज तस्करीसाठी येणाऱ्या एका संशयिताला पकडण्यासाठी एएनसी पथकाने सापळा रचला.
यादरम्यान, संशयित कृष्णा सोनकेल्लू संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडून ६.८२ लाख रुपये किमतीचे ४५.५ ग्रॅम 'मेथाफेटामाईन' जप्त करण्यात आले. त्यानंतर त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे गोव्यातील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे मानले जात आहे.
अश्रफ शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी
सोनकेल्लूच्या अधिक चौकशीदरम्यान, त्याने हे ड्रग्ज मुंबईतील अश्रफ शेख याच्याकडून आणल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे, एएनसीचे निरीक्षक संजित पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली कॉन्स्टेबल मकरंद घाडी आणि साईराज नाईक यांचे पथक तत्काळ मुंबईला रवाना झाले. या पथकाने मुख्य सूत्रधार अश्रफ शेख याला ताब्यात घेऊन गोव्यात आणले आणि त्याला अटक केली. शेखला पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.