मडगाव : बार्से गोसावीवाडा येथील ३२ वर्षीय सीमा गोसावी हिच्या आत्महत्येप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सीमाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गौरेश गोसावी, लोचन गोसावी आणि उल्हास गोसावी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमा गोसावीचे संशयित गौरेश गोसावीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही काळापासून त्यांच्यातील संबंध बिघडले होते. आत्महत्येपूर्वी सीमा गौरेशच्या घरी लग्नाबाबत विचारणा करण्यासाठी गेली होती. त्यावेळी, गौरेश आणि इतरांनी तिच्या मानसिक स्थितीचा विचार न करता, तिला 'वेडी' संबोधले आणि ‘तू आत्महत्याच कर’ असे म्हटले, असा आरोप सीमाच्या आईने तक्रारीत केला आहे. यानंतरच मुलीने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
न्यायालयाचे निर्देश
पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल केल्यानंतर, आता न्यायालयाने तिन्ही संशयितांना सशर्त जामीन दिला आहे. यानुसार, अटक झाल्यास त्यांना १५ हजार रुपये आणि तेवढ्याच रकमेचा हमीदार सादर करावा लागेल. संशयित गौरेश गोसावी याला २ जुलैपर्यंत दररोज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तसेच तिन्ही संशयितांनी तपासात पूर्ण सहकार्य करावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.