ग्रामीण आहारातून प्रोटीन सेवन करण्यात गोवा अव्वल

सिक्किम द्वितीय स्थानी : प्रोटीन सेवनाची राष्ट्रीय सरासरी ६१.८ ग्रॅम


7 hours ago
ग्रामीण आहारातून प्रोटीन सेवन करण्यात गोवा अव्वल

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यातील ग्रामीण भागात दररोज दरडोई आहारातून सेवन केल्या जाणाऱ्या प्रोटीन या पोषणमूल्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये गोव्यातील ग्रामीण भागात दररोज दरडोई सरासरी ८३.७ ग्रॅम प्रोटीनचे सेवन केले गेले. सिक्कीममधील ग्रामीण भागात दररोज दरडोई ८३.२ ग्रॅम प्रोटीनचे सेवन केले गेले. शहरी भागांचा विचार करता गोव्यात ८६.६ ग्रॅम, तर सिक्कीममध्ये ९४ ग्रॅम प्रोटीनचे सेवन करण्यात आले. केंद्रीय सांख्यिकी खात्याच्या नुकत्याच जारी झालेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
हा अहवाल तयार करण्यासाठी खात्याने २०२३-२४ मध्ये देशभरातील २.६१ लाख कुटुंबाचे सर्व्हेक्षण केले होते. यामध्ये गोव्यातील ७२० कुटुंबांचा समावेश होता. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येकी ३६० कुटुंबे निवडण्यात आली. यामध्ये कुटुंबातील एक व्यक्ती दररोज तिच्या आहारामधून प्रोटीन, कॅलरी आणि फॅट किती प्रमाणात घेते, याची माहिती गोळा करण्यात आली. ग्रामीण भागात आहारातून दररोज दरडोई प्रोटीनचे सेवन करण्याची राष्ट्रीय सरासरी ६१.८ ग्रॅम आहे, तर शहरी भागातील राष्ट्रीय सरासरी ६३.४ ग्रॅम आहे. केरळ, हिमाचल प्रदेश येथील प्रोटीन सेवनही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.
आहारातून कॅलरीचे सेवन करण्यात सिक्कीम देशात पहिल्या स्थानी राहिला. येथील ग्रामीण भागात दररोज दरडोई सरासरी ३,०५२ किलो कॅलरीचे सेवन केले जाते. शहरी भागात ३,३४१ किलो कॅलरीचे सेवन केले जाते. कॅलरी सेवानात सिक्कीमनंतर गोव्याचा क्रमांक लागतो. गोव्यातील ग्रामीण भागात दररोज दरडोई सरासरी २,५८४ किलो कॅलरीचे सेवन केले जाते. शहरी भागात २,७४७ किलो कॅलरीचे सेवन केले जाते. यानंतर हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश यांचा क्रमांक लागतो. कॅलरी सेवनाची राष्ट्रीय सरासरी ग्रामीण भागासाठी २,२१२, तर शहरी भागासाठी २,२४० किलो कॅलरी इतकी आहे.
सिक्कीममधील ग्रामीण भागात दररोज दरडोई आहारातून फॅटचे सेवन करण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक म्हणजेच ९१.३ ग्रॅम इतके आहे. यानंतर हरियाणा (८२.२ ग्रॅम), हिमाचल प्रदेश (७६.८ ग्रॅम), गोवा (७५.३ ग्रॅम) या राज्यांचा क्रमांक लागतो. याची राष्ट्रीय सरासरी ६०.४ ग्रॅम आहे. गोव्यातील शहरी भागात ८४ ग्रॅम फॅटचे सेवन होते. याची राष्ट्रीय सरासरी ६९.८ ग्रॅम आहे. केंद्रशासित प्रदेशांचा विचार करता चंदिगड (१०१.१ ग्रॅम), लडाख (९१ ग्रॅम), पुद्दुचेरी (८३ ग्रॅम) येथील शहरी भागात फॅट सेवनाचे प्रमाण अधिक आहे.
तृणधान्यातून सर्वाधिक प्रोटीन
अहवालानुसार गोव्यातील ग्रामीण आणि शहरी भागात आहारातून सेवन केल्या जाणाऱ्या एकूण प्रोटीनपैकी सर्वाधिक ३२.७ टक्के हे विविध प्रकारच्या तृणधान्यातून सेवन केले जाते. मासे, अंडी यातून ग्रामीण भागात ३१.८ टक्के, तर शहरी भागात २९.३ टक्के सेवन केले जाते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतून ग्रामीण भागात ६.८ टक्के, तर शहरी भागात ७.५ टक्के सेवन केले जाते.