घरावर माड कोसळून भाऊ-बहीण जखमी

पोडवाळ- खोर्जुवे येथील घटना : २ लाखांचे नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
घरावर माड कोसळून भाऊ-बहीण जखमी

म्हापसा : पोडवाळ- खोर्जुवे येथील विनायक नागडे यांच्या घरावर माड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत भाऊ- बहीण जखमी झाले. विकी नागडे (३२) व वैद्यही नागडे (२८) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

ही दुर्घटना मंगळवारी सकाळी ६.१० वा. सुमारास घडली. घराशेजारी असलेला माड अचानक नागडे यांच्या घरावर कोसळला. यावेळी विकी हा झोपला होता, तर त्याची बहीण काम करीत होती. माड घरावर कोसळताच तिने भाऊ विकी याला सतर्क केले. वैद्यहीच्या डोके तसेच अंगावर कौले कोसळून ती जखमी झाली. विकी याच्या पाठीवर कौले कोसळली. तत्काळ त्यांना शेजारील लोकांनी हळदोणा आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी पाठवले.

घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशामक दलाचे हवालदार विष्णू गावस, आनंद मांद्रेकर, संजय फडते, साईराज काळोजी, आकाश नाईक व श्रीनाथ नर्से यांनी घटनास्थळी जाऊन घरावर पडलेला माड कापून बाजूला केला.

कौले, वासे तुटून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले. अग्निशामक दलाने २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे. घटनेचा पंचनामा म्हापसा पोलिसांनी केला.

घटनेच्या वेळी पाऊस, वारा नव्हता तरीही माड घरावर कोसळला. या दुर्घटनेत आम्ही भाऊ, बहीण देवाच्या कृपेने वाचलो, असे विकी याने सांगितले.

कुटुंबाला २५ हजारांची आर्थिक मदत

आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी घटनास्थळी भेट देऊन नागडे कुटुंबीयांना आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच म्हापसाचे नगरसेवक अॅड. तारक आरोलकर यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. 

हेही वाचा