कोलवाळ पोलीस स्थानकाचा कारभार अडगळीच्या जागी

चार वर्षांनंतरही पोलीस स्थानक स्वतंत्र इमारतीच्या प्रतीक्षेत

Story: उमेश झर्मेकर |
4 hours ago
कोलवाळ पोलीस स्थानकाचा कारभार अडगळीच्या जागी

जलस्रोत खात्याच्या निवासी गाळ्यांत सुरू असलेले कोलवाळ पोलीस स्थानक.
गोवन वार्ता
म्हापसा : कोलवाळ पोलीस स्थानकाचे उद्घाटन चार वर्षांपूर्वी झाले होते. मात्र अद्याप सुसज्ज अशी इमारत न मिळाल्याने जलस्रोत खात्याच्या अडगळीच्या दोन निवासी गाळ्यांमध्ये हे पोलीस स्थानक कार्यरत आहे.
राज्य सरकारने थिवी मतदारसंघासाठी विशेष अशा कोलवाळ पोलीस स्थानकाची निर्मिती केली होती. त्यानुसार १८ जून २०२१ रोजी, क्रांतीदिनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या पोलीस स्थानकाचे लोकार्पण झाले होते. २०१९ मध्ये सरकारने बार्देश तालुक्यातील या नवीन पोलीस स्थानकाला मंजुरी दिली होती.
मुशीरवाडा कोलवाळ येथील जलस्रोत खात्याच्या विनावापर असलेल्या निवासी गाळ्यांमध्ये हंगामी स्वरूपाचे हे पोलीस स्थानक सुरू करण्यात आले होते. या पोलीस स्थानकासाठी लवकरच नवीन सुसज्ज इमारत उभारली जाईल, अशी घोषणा उद्घाटनावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली होती. हे पोलीस स्थानक मंजूर झाल्यानंतर सरकाने गृहनिर्माण मंडळाच्या कोलवाळ येथील बांधकाम प्रकल्प इमारतीमध्ये ते सुरू करण्याचा विचार चालवला होता. ही जागा योग्य नसल्याने जमीन संपादित करून पोलीस स्थानकासाठी इमारत उभारण्यावर विचार झाला. मात्र त्यासाठी बराच वेळ जाणार असल्याने विद्यमान जागी हंगामी स्वरूपात पोलीस स्थानक सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर पोलीस स्थानकासाठी नवीन इमारतीसंदर्भातील प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. गेली चार वर्षे या अपुऱ्या सुविधा व अडगळीच्या ठिकाणी हे पोलीस स्थानक कार्यरत आहे.
विश्रांतीसाठी बॅरेक तसेच इतर आवश्यक सुविधा नसल्यामुळे पोलीस कर्मचारी वर्ग सध्या परिस्थितीशी जुळवून घेत आहेत; परंतु महिला कर्मचाऱ्यांसाठी ही परिस्थिती जुळवून घेणे अडचणीचे ठरत आहे. शिवाय, या पोलीस स्थानकाशी जोडलेल्या थिवी मतदारसंघातील कोलवाळ, रेवोडा, नादोडा, पीर्ण, अस्नोडा, सिरसई, थिवी व कामुर्ली पंचायत क्षेत्रांतील लोकांना पोलीस स्थानकातील अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी स्वतंत्र इमारत बांधून पोलीस स्थानकाला सुसज्ज असे स्वरूप देण्याची मागणी केली आहे.
जागा कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची
कोलवाळ पोलीस स्थानकाची विद्यमान जागा ही कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची जागा आहे. केंद्र सरकारकडून ही जमीन रिकामी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्यास हे पोलीस स्थानक तत्काळ हटवून जागा कारागृह प्रशासनाच्या स्वाधीन करावी लागणार आहे. त्यामुळे कोलवाळ पोलीस स्थानकासाठी सरकारने वेळीच पर्यायी जागेचे नियोजन करणे गरजेचे आहे.
कोलवाळ पोलीस स्थानकासाठी राज्य गृहनिर्माण महामंडळाने कोलवाळ औद्योगिक वसाहतीमध्ये ४ हजार चौ. मीटरचा भूखंड ठेवला आहे. पोलीस खाते आणि गृहनिर्माण मंडळ यांच्यात जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेचा पाठपुरावा करून याठिकाणी सुसज्ज पोलीस स्थानकाची इमारत उभारण्यासाठी मी प्रत्नरत आहे.
- नीळकंठ हळर्णकर, पशुसंवर्धन मंत्री.