जुन्या सहा फेरीबोटींचा १४ जुलै रोजी लिलाव

कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून निविदा जारी


7 hours ago
जुन्या सहा फेरीबोटींचा १४ जुलै रोजी लिलाव

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नदी परिवहन खात्याच्या जुन्या सहा फेरीबोटींच्या लिलावासाठी कचरा व्यवस्थापन महामंडळाने निविदा काढल्या आहेत. १४ जुलै रोजी सकाळी ११.३० वा. या फेरीबोटींच्या लिलावाला सुरुवात होईल. सर्वांत जास्त बोली लावणाऱ्या कंत्राटदाराला या फेरीबोटी मिळतील.
या फेरीबोटींचा लिलाव दुसऱ्यांदा काढण्यात आला आहे. यापूर्वी काढलेल्या निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. काही कंत्राटदारांना लिलावाची किमान किंमत जास्त वाटल्याने त्यांनी लिलावाकडे पाठ फिरविली होती. आम्ही आता नवीन सुधारित निविदा प्रसिद्ध केली आहे, असे कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
यावेळी सहा जुन्या फेरीबोटींचा लिलाव होणार आहे. प्रत्येकी तीन फेरीबोटींची बोली दोन लॉटमध्ये लावली जाईल, म्हणजेच कंत्राटदाराला एक फेरीबोट विकत घेता येणार नाही, तर त्याला एकाच वेळी तीन फेरीबोटी खरेदी कराव्या लागतील. लिलावासाठी काढलेल्या फेरीबोटींमध्ये बिठ्ठोण (पीएनजे ५८५), कोलवा (पीएनजे ४८२), बेतूल (पीएनजे ६०५), वागातोर (पीएनजे ५३५), दूधसागर (पीएनजे ४७३) आणि केपे (पीएनजे ४६५) या फेरीबोटींचा समावेश आहे.
तीन फेरीबोटींसाठी किमान किंमत ६.१० लाख रुपये
फेरीबोटींच्या प्रत्येक लॉटमधील तीन फेरीबोटींसाठी लिलावाची किमान किंमत ६.१० लाख रुपये आहे. १० जुलैपर्यंत या फेरीबोटींची पाहणी करता येईल. ११ जुलै रोजी सायं. ४.३० पर्यंत ऑनलाइन निविदा सादर करण्याची अंतिम मुदत आहे. बोलीच्या कागदपत्रांसाठी कंत्राटदाराला १ हजार रुपये भरावे लागतील. फेरीबोटी आहेत त्याच स्थितीत आणि कोणतीही तक्रार न करता कंत्राटदाराला स्वीकाराव्या लागतील.